नीरा: कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर लोक भितीने पूर्णपणे खचून जात आहेत. सद्यस्थितीत धडधाकट व्यक्तीही तीन, चार दिवसात गंभीर होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत ८६ वर्षांच्या आजींनी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर खचून न जाता त्यावर यशस्वीरीत्या मात केली आहे. पुरंदर तालुक्यात थोपटेवाडी येथे असणाऱ्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. अवघ्या आठ दिवसात कोरोनाला हरवून आजी घरी परतल्या आहेत.
यशोधा थोपटे असे आजींचे नाव आहे. आजींना काही दिवसांपूर्वी दम लागणे, शरीर अस्वस्थ होणे असे त्रास होऊ लागले. फँमिली डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी खाजगी लँबमध्ये कोरोना तपासणी करून घेतली. अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर त्यांच्या कुटुंबीयांनी आजींना नीरा येथील जीवनदीप हॉस्पिटल अँन्ड क्रिटीकेअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचाराला सकारात्मक प्रतिसाद देत न घाबरता त्यांनी कोरोनाशी लढा दिला. रुग्णालयातील डॉ. रोहन लकडे व त्यांच्या टिमने आजींवर यशस्वी उपचार केले. अखेर आठ दिवसांनी त्यांना घरी सोडण्यात आले.
थोपटे आजींचा आदर्श इतर रुग्णांनी घ्यावा. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर घाबरून न जाता धिराने सामोरे जावे. असे डॉ. लकडे यांनी सांगितले आहे.