पुणे: सुरवातीला सर्दी, खोकला व बारीक ताप अशी कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आली. डॉक्टरांनी औषधे दिली व छाती तपासली, त्यावेळी विशेष काही जाणवले नाही. मात्र अचानक प्रकृती खालावल्याने त्रास जाणवू लागला. तपासणीअंती कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. सिटीसॅन स्कोअर २० आणि सीआरपी १७० असल्याने प्रकृती नाजूक होती. मात्र प्रबळ इच्छाशक्ती, सकारात्मकतामुळे ६९ वर्षीय आजोबानी मला काहीही होणार नाही या विचारानेच कोरोनाला हरवले. कुटुंब चिंतेत असताना त्यांना धीर देत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे.
काळजी घेऊनही रानडे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने कुटुंबातील सदस्य काळजीत पडले. छातीमध्ये संसर्ग झाल्याने तात्काळ रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार एवढ्या रुग्ण संख्येमध्ये तसेच बेड शिल्लक नसल्याच्या माहितीमुळे बेड मिळेल का? या चिंतेत नातेवाईक होते. घाबरू नका मला काहीही होणार नाही, काळजी करू नका, बेड नक्की मिळेल. या शब्दात रानडे यांनीच कुटूंबाला धीर दिला. रिपोर्ट बघून त्यांना दत्तवाडीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. रानडे यांची प्रकृती बिकट होत होती.
ऑक्सिजन सपोर्ट १२ लिटर पर्यंत लागत होता. अशा वेळी रानडे यांनी दाखवलेला स्वतः वरचा विश्वास तसेच डॉक्टरांनी केलेल्या उत्तम उपचारांमुळे ते १९ दिवसात बरे झाले. रुग्णालयाने कोणत्याही औषधासाठी नातेवाईकांना सांगितले नाही. डॉक्टरांनी केलेल्या उपचारातूनच रानडे यातून बाहेर पडले.
दरम्यान रानडे यांची मोठी मुलगी स्वाती ह्या गोव्यात होत्या. दोन्ही राज्यांच्या वेगवेगळ्या नियमावलीमुळे त्यांना पुण्यात येता आले नाही. त्यानंतर त्या तौक्ते चक्रीवादळात अडकून पडल्या होत्या. जावई अर्णव भुजबळ हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याने गृहविलगीकरणात होते. त्यांचे मित्र शिवराज शिंदे यांनी धावपळ केल्याने रानडे यांना वेळीच रुग्णालयात दाखल करता आले.