लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित १९ वर्षांखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत संयुक्त जिल्हा व केडन्स या संघांनी अनुक्रमे पीवायसी हिंदू जिमखाना व २२ यार्डस हा संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीच्या लढतीत अभिषेक पवारच्या (११६ धावा) धडाकेबाज खेळीच्या जोरावर संयुक्त जिल्हा संघाने पीवायसी हिंदू जिमखाना संघाचा ८९ धावांनी पराभव करून दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली. प्रथम फलंदाजी करताना संयुक्त जिल्हा संघाने ४५ षटकात ५ बाद ३०१ धावांचा डोंगर उभा केला. यात अभिषेक पवारने ९६ चेंडूंत ७ चौकार व ९ षटकारांच्या मदतीने ११६ धावा व सचिन धसने ८५ चेंडूंत १४ चौकार व २ षटकारांच्या मदतीने १०५ धावांची शतकी खेळी केली.
या दोघांनी चौथ्या गड्यासाठी १४१ चेंडूंत १८८ धावांची भागीदारी करून संघाला भक्कम धावसंख्या उभारून दिली. अभिषेक पवार त्रिफळा बाद झाल्यावर सचिन धसने प्रथमेश बाजारेच्या साथीत पाचव्या गड्यासाठी २९ चेंडूंत ४५ धावांची भागीदारी करून संघाला ३०१ धावांचे आव्हान गाठून दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना पीवायसी हिंदू जिमखाना संघाचा डाव ४५ षटकात ९ बाद २१२ धावांवर संपुष्टात आला. यात श्रेयस वाळेकर ६६, सोहम शिंदे ४९, अखिलेश गवळे ३२ संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. संयुक्त जिल्हा संघाकडून प्रथमेश बाजारे (३-३२), अभिषेक निशाद (३-४४), रिषभ बन्सल(१-२७) यांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. शतकी खेळी करणारा अभिषेक पवार सामन्याचा मानकरी ठरला.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात हर्षल काटेच्या (७० धावा) अर्धशतकी खेळीच्या जोरावर केडन्स क्रिकेट अकादमी संघाने २२ यार्डस संघाचा ९३ धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली. पहिल्यांदा खेळताना केडन्स क्रिकेट अकादमी संघाने ४५ षटकात ६ बाद २९४ धावा केल्या. यामध्ये अर्शिन कुलकर्णी (७४ धावा) व प्रद्युम्न चव्हाण (४४धावा) यांनी दुसऱ्या गड्यासाठी १०४ चेंडूंत ८८ धावांची भागीदारी केली. हे दोघेही बाद झाल्यानंतर हर्षल काटे (७० धावा) व कौशल तांबे (६५ धावा) यांनी चौथ्या गड्यासाठी ८४ चेंडूंत ११९ धावांची भागीदारी करून समाधानकारक धावसंख्या उभारून दिली.
याच्या उत्तरात २२ यार्डस संघाचा डाव ४१.१ षटकात २०१ धावावर आटोपला. यामध्ये तेजस तोलसणकरने एका बाजूने लढताना ९७ धावांची खेळी केली. तेजसला अभिजित सावळे ३८, अथर्व शिंदे १९ यांनी धावा करून साथ दिली. केडन्सकडून राझीक फल्लाह (२-३४), सोहम सरवदे (२-१८), प्रद्युम्न चव्हाण (२-३२), दिग्विजय पाटील (२-२२), कौशल तांबे (१-२४) यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सामन्याचा मानकरी हर्षल काटे ठरला.