पुणे : कोरेगाव पार्क येथील सेंट मिराज महाविद्यालयातील प्रवेशद्वारासमोरच चार-पाच वाहतूक पोलीस उभे राहून ज्या विद्यार्थिनींकडे हेल्मेट नाही, त्यांना ५०० रूपये दंड आकारत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून रोज सकाळी दहानंतर हे पोलीस महाविद्यालयासमोर येऊन केवळ विद्यार्थिनींवरच कारवाई करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे. वाहतूक विभागातर्फे १ जानेवारीपासून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सध्या हेल्मेट घालण्याबाबत जनजागृती केली जात आहे. परंतु, सेंट मिराज महाविद्यालयासमोर वाहतूक पोलीस सक्तीने केवळ विद्यार्थिनींकडून हेल्मेट नसल्यास ५०० रूपये वसुल करीत आहेत. याबाबत सेंट मिराज महाविद्यालयाकडून वाहतूक विभागातील पोलीसांना विचारले असता, त्यांनी आम्ही तुम्हाला नोटीस पाठविलेली आहे. त्यामुळे आम्ही कारवाई करणार आहोत, असे सांगितले आहे. पण महाविद्यालयाकडे कोणतीही नोटीस आली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ही कारवाई नेमकी का केली जात आहे, याबाबत विद्यार्थिनींमध्ये संभ्रम आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे. विद्यार्थिनींकडे दुचाकी चालविण्याचे लायसन्स नसेल, तर दंड करणे अपेक्षित आहे. परंतु, सर्व शहरात हेल्मेटविना वाहनचालक फिरत असताना केवळ महाविद्यालयासमोरच कारवाई का केली जात आहे, असा सवाल विद्यार्थिनींनी उपस्थित केला आहे.
कोरेगाव पार्क येथे हेल्मेट नसणाऱ्या कॉलेजच्या विद्यार्थिनींवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 6:27 PM
वाहतूक विभागातर्फे १ जानेवारीपासून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
ठळक मुद्देतीन दिवसांपासून वाहतूक पोलीस ठाण मांडून विद्यार्थिनींकडून हेल्मेट नसल्यास ५०० रूपये दंड वसुल