पुणे : भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शहर शाखेच्यावतीने मंगळवारी आंदोलन करण्यात आले. त्यानंतर पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर ज्या कलमांखाली गुन्हा दाखल केला, त्याच कलमाखाली पडळकर यांच्यावरही त्वरित गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.
पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शहर प्रवक्ते प्रदीप देशमुख तसेच किशोर कांबळे, महेश पवार, माधव पवार, मधुकर पवार, महेश हंडे, शशिकांत जगताप, दीपक कामठे, शुभम मताळे यांचा शिष्टमंडळात समावेश होता.
पडळकर यांनी देशाचे तुकडे करण्याची भाषा केली. ज्येष्ठ नेत्याचा अवमानकारक उल्लेख केला. राहुल गांधी यांना याच कारणावरून शिक्षा देण्यात आली. त्यांची खासदारकी रद्द केली आणि आता त्यांचे निवासस्थानही काढून घेण्यात येत आहे. राहुल यांच्याप्रमाणेच पडळकर यांनाही आता अशीच शिक्षा मिळेल, पोलिस गंभीरपणे या गुन्ह्याचा तपास करतील, अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त केली आहे.
काय म्हणाले होते पडळकर
ज्यांचे चार खासदार असा माणूस पंतप्रधान होवू शकतो का. सभागृहात काही बोलायला गेलो तर ते राष्ट्रीय नेते आहेत असे सांगितले जाते. तुमचा आकडा शंभरच्या वर जात नाही. त्यांची पंतप्रधान पदाची इच्छा पूर्ण करायची असेल तर लवासा मगरपट्टा व बारामती तीन राज्ये करावी लागतील. लवासाच्या मुख्यमंत्रीपदी सुप्रिया सुळे, मगरपट्ट्याच्या मुख्यमंत्रीपदी जयंत पाटील तर बारामतीच्या मुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची निवड करा. या राज्यांचा एक देश करुन त्यांचे पंतप्रधान शरद पवारांना करा.