पुणे : राज्याचे मत्स्य आणि बंदर मंत्री नितेश राणे यांनी सासवड येथे आयोजित एका कार्यक्रमात लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी व वायनाड च्या खासदार, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्याबाबत बोलताना केरळ या राज्याची तुलना थेट पाकिस्तानशी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.केरळ हे मिनी पाकिस्तान असून खासदार राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी तिथून निवडून येतात. केरळ मधील अतिरेकी राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना मतदान करतात. अतिरेक्यांच्या पाठिंब्यामुळे गांधी खासदार होतात, असे वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केले आहे. राणेंच्या या वक्तव्यावरून काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
मंत्री नितेश राणे यांच्यावर प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले. यावेळी पुणे शहर व जिल्हा विद्यार्थी काँग्रेस सरचिटणीस कृष्णा साठे, काँग्रेस कार्यकर्ते सचिन मोरे आणि बाबा मिसाळ यांची उपस्थिती होती.
यावेळी सुरवसे पाटील यांनी, देशाची एकता, सहिष्णुता आणि अखंडतेला बाधा निर्माण करणारे विभाजनकारी, धार्मिक द्वेष पसरवणारे प्रक्षोभक व चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या, संविधानचा अपमान करणाऱ्या नितेश राणे यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आम्ही महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कडून केली असल्याचे सांगितले.