तळेघर (पुणे) : आदिवासी भागातील शेतकऱ्यांची पिळवणूक करून जो कोणी माती उपसा करत असेल तर त्यांच्यावर थेट फौजदारी दाखल करा, अशा सूचना माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तळेघर, म्हाळुंगे, आहूपे, डोण, असाणे, बोरघर, ह्या ठिकाणी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांचा गावभेट दौरा झाला. यावेळी ठिकठिकाणी आदिवासी भागातील ग्रामस्थांनी वीज, पाणी, रस्ता, रोजगार, पर्यटण, शिक्षण याबाबत विविध समस्या मांडल्या. यावेळी वळसे पाटील म्हणाले की, आदिवासी भागातील तरुण भरपूर शिकले. परंतु नोकरी मिळत नसल्यामुळे तरुणांमध्ये नैराश्य येत आहे. काही तरुण धार्मिक मुद्द्यांकडे वळाले आहेत. गडकोटसारख्या मोहिमा आपल्या भागात होऊन स्थानिक तरुणांची माथी भडकवण्याचे काम होत आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या गोष्टींपासून लोकांनी सावध राहिले पाहिजे. शिक्षण व रोजगार यावर भर दिला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार डाॅ. अमोल कोल्हे म्हणाले, आदिवासी भागातील वनउपजतमधून आदिवासी लोकांना हक्काचे साधन मिळावे तसेच यावर उद्योग व्यवसाय सुरू व्हावा यासाठी राष्ट्रीय वनऔषधी संशोधन केंद्र सुरू केले जाणार आहे. यासाठी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांनी प्रकल्प अहवाल तयार केला असून ह्याला लवकरच केंद्र सरकारकडून मंजुरी मिळणार आहे. आदिवासी भागातील मुख्य उत्पन्नाचे साधन असणारा हिरडा वनउपजत मधून वगळावा अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार आहे.
यावेळी माजी समाजकल्याण सभापती सुभाषराव मोरमारे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समिती माजी सभापती संजय गवारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे, संदीप चपटे, माजी सभापती प्रकाश घोलप, रूपाली जगदाळे, इंदुबाई लोहकरे, जनाबाई उगले, शरद बॅंकेचे संचालक मारुती लोहकरे, प्रदीप मोंडकर, सलिम तांबोळी, शामराव बांबळे, संजय केंगले, बाळासाहेब कोळप, नामदेव दांगट, मारुती केंगले, बबन घोईरत, कृष्णा गवारी, रमेश लोहकरे, गोविंद पारधी, शंकर लांघी, जावजी गवारी, परिसरातील सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.