पुणे : सोशल मीडियावर प्रक्षोभक लिखाणातून हिंदू समाजाबद्दल जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी अभिनेत्री स्वरा भास्कर विरुद्ध भारतीय दंड विधान कलम १५३ अ आणि २९५ अ नुसार गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी भाजप वकील आघाडीचे जनरल सेक्रेटरी ॲड. विजय राठोड यांनी फरासखाना पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.
स्वरा भास्कर ही आपल्या ट्विटरवरून स्वत:ची मते मांडत असते. ३ ऑगस्टला जाती-जातीमध्ये तेढ पसरेल असे ्ट्विट तिने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर १६ ऑगस्टला तिने अफगाणिस्तानातील अतिरेकी तालिबानी संघटनेचा हिंदुत्वाशी संबंध जोडून हिंदूबद्दल ते जहाल आहेत, असे ्ट्विट केले. हिंदूंची आणि तालिबानी अतिरेकी यांची एकच विकृत मानसिकता आहे. आपण हिंदूंच्या जहाल वागणुकीबद्दल गप्प बसण्याचे टाळू नये. यावरून तिला हिंदू आणि अफगाणी तालिबानी यांची वागणूक एकसमान असल्याचे सूचित करायचे आहे स्पष्ट होत आहे. वास्तविक तालिबानी हे लोकशाही मानत नाहीत. ते जहाल कट्टरवादी आहेत तसेच ते जनतेच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करीत नाहीत. अशा प्रक्षोभक लिखाणातून हिंदू समाजाबद्दल इतर समाजाचा दृष्टिकोन बदलू शकतो. तिच्या या ट्विटमुळे अकारण हिंदू समाजाबाबत इतर समाजाचे गैरसमज निर्माण होऊ शकतात. तरी अभिनेत्री स्वरा भास्कर हिच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी राठोड यांनी केली आहे.
--------------------------------