पुणे : बंदुकीचा धाक दाखवत तरुणाचे अपहरण केल्याप्रकरणी आमदार योगेश टिळेकरसहित त्यांच्या बंधूसह इतरांवर गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश लष्कर कोर्टातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. एस. कोकाटे यांनी दिला आहे.या प्रकरणी योगेश लक्ष्मण कामठे (वय ३२, रा. कोंढवा बुद्रुक, भोलेनाथ चौक) यांनी अॅड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत लष्कर न्यायालयात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आमदार योगेश पुंडलिक टिळेकर, त्यांचे बंधू चेतन पुंडलिक टिळेकर (दोघेही रा. टिळेकर हाऊस, कोंढवा बुद्रुक), आनंद देशमुख (रा. लक्ष्मीनगर, कोंढवा बुद्रुक), गणेश मेमाणे व त्यांचे इतर ५ ते ६ साथीदारांविरुद्ध खासगी तक्रार दाखल केली होती.त्यानुसार न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. फिर्यादी कामठे यांचे मित्र अतुल हनुमंत गीते यांना आमदार टिळेकर यांचे बंधू चेतन टिळेकर यांनी घरी बोलावून मारहाण करून आई-वडिलांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे फिर्यादी व त्यांच्यासोबत महेश हनुमंत कामठे, ओंकार भोसले, १ जानेवारी रोजी अतुल यांच्यासह तक्रार देण्यासाठी गेले होते. त्यावेळी योगेश टिळेकर यांनी फिर्यादींना कॉल करून शिवीगाळ केली. तसेच ‘आमच्यावर गुन्हा दाखल झाला तर तुला खानदानासहीत संपवून टाकेन. तुझ्यात दम असला तर गुन्हा दाखल करून दाखव’, अशी धमकी दिली. त्यामुळे फिर्यादी यांनी घाबरून फोन कट केला. तेवढ्यात चेतन पुंडलिक टिळेकर, आनंद देशमुख, गणेश मेमाणे व इतर ५ ते ६ जण पोलीस स्टेशनमध्ये आले. त्यावेळी चेतन टिळेकर यांनी फिर्यादीस पुन्हा शिवीगाळ करत आमदार साहेबांचा फोन आला तरी तू ऐकत नाही का़, असे म्हणत फिर्यादी यांच्या डोक्याला बंदूक लावली व त्यांना उचलून गाडीत बसवले. त्यानंतर गाडीत बसलेल्या आनंद देशमुख यांनी हत्याराने फिर्यादी यांच्या डोक्यावर वार केला. स्वत:ची सुटका करून घेत फिर्यादी यांनी ससून रुग्णालयात जाऊन उपचार घेतले, असे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले होते.
आमदार टिळेकरसह बंधूवर गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 2:22 AM