पुणे : डी. एस. कुलकर्णी यांच्याशी संगनमत करून करार ठरल्याप्रमाणे बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर पैसे न देता एकदम गृहकर्जाचे ५० टक्क्यांहून अधिक रक्कम देणाऱ्या फायनान्स कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी डीएसकेकडून फ्लॅट खरेदी करणाऱ्यांनी केली आहे. गुन्हा दाखल केला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
आधी घर पैसे नंतर पैसे या डीएसके यांच्या पिरंगुट येथील गृहप्रकल्पातील ५०० हून अधिक फ्लॅट खरेदीसाठी एचएफसी फायनान्स कंपनीबरोबर करार केला होता. मात्र, गुंतवणूकदारांचे पैसे बुडविल्याने डी. एस. कुलकर्णी व इतरांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली. त्याअगोदर त्यांच्या गृहप्रकल्पाचे बांधकाम थांबले होते. गृहकर्जामध्ये बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यानुसार कर्जातील रक्कम देण्याचे करारात ठरले होते. मात्र, पिरंगुट येथील प्रकल्पातील अनेक इमारतीचे फक्त पायाचे काम झाले असताना फायनान्स कंपनीने कर्जापैकी ५० टक्क्यांहून अधिक रक्कम डीएसके यांच्या कंपनीला वितरित केली. त्यामुळे येथे फ्लॅट खरेदी केलेल्या नागरिकांना फ्लॅट तर मिळाला नाही, शिवाय त्यांचा सिबील स्कोअर खराब झाला. त्यामुळे त्यांना दुसरे घरच काय काहीही खरेदी करण्यासाठी कर्ज मिळू शकत नाही. त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेपासून रिझर्व्ह बँकेपर्यंत सर्वांकडे तक्रार करूनही एच एफसी फायनान्स कंपनीविरुद्ध कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता या फ्लॅटधारकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
या फ्लॅटधारकांना गृहकर्ज माफी द्यावी, दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालानुसार त्यांचा सिबिल स्कोअरची पुनर्स्थापना करावी. एच.एफ.सी. आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी डी.एस.के गृहप्रकल्प गुंतवणूकदारांचे प्रतिनिधी संजय आश्रित, पुणेकर नागरिक कृती समितीचे सचिव मिहीर थत्ते यांनी केली आहे. डी. एस. के. गृहकर्ज घोटाळ्यातील सर्व बाधित लोकांचा रविवारी(दि.२९ मे) सायंकाळी ५ वाजता सारसबाग येथील गणपती मंदिरामागे बैठक आयोजित करण्यात आली आहे.