पुणे : कर्ज देण्याचे आश्वासन देऊन अनेक महिलांकडून प्रोसेसिंग फीच्या नावाने फसवणूक केली. अशा दोन महिलांसहित आणखी दोघांवर फसवणूक व बनावटीकरणाचा गुन्हा दाखल केला. तसेच त्या तपासाचा अहवाल एक महिन्याच्या आत सादर करण्याचे आदेश समर्थ पोलीस ठाण्याच्या पोलिसांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी दिले आहेत. फिर्यादी महिलेने २०१६ पासून घडत असलेल्या प्रकाराबाबत अॅड.विजयसिंह ठोंबरे व अॅड.हितेश सोनार यांच्या मार्फत न्यायालयात फिर्याद दाखल करण्यासाठी अर्ज केला होता. आरोपी मनीषा ढोणे हीने १२०० रुपयांच्या प्रमाणपत्रावर कर्ज मिळेल, असे सांगून सुरुवातीस फिर्यादीसह ६० ते ७० महिलांची फसवणूक केली. त्यानंतर फिर्यादीसह इतर ६० ते ७० महिलांना आरोपी मनीषा तोष्णीवाल, अशोक तोष्णीवाल, कमलेश तोष्णीवाल यांच्या हडपसर येथील बापजी फायनान्समधून कर्ज घेण्यास सांगितले. दरम्यान फिर्यादी यांनी बापजी फायनान्स याठिकाणी जाऊ न कर्जाविषयी विचारणा केली असता, आरोपींनी त्यांच्याकडून व इतर महिलांकडून प्रोसेसिंग फीच्या नावाखाली १२ लाख रुपयांची रक्कम घेऊन पळ काढला होता. यानंतर फिर्यादी यांनी वेळोवेळी पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यासाठी पाठपुरावा केला. मात्र त्याची दखल घेण्यात न आल्याने त्यांनी अॅड.ठोंबरे व अॅड. सोनार यांच्या मार्फत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात गुन्हा नोंदविण्यासाठी अर्ज दाखल केला. सदरचा गुन्हा गंभीर असून सामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या आरोपीस शासन होणे आवश्यक असल्याचा तसेच प्रथम दर्शनी फसवणूक व बनावटीकारणाचा गुन्हा स्पष्ट होत असल्याचा युक्तिवाद ठोंबरे यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने मनीषा तोष्णीवाल, अशोक तोष्णीवाल, कमलेश तोष्णीवाल (सर्व रा. अरुणा चौक, नाना पेठ) यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करुन त्याचा अहवाल एका महिन्याच्या आत न्यायालयात सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
कर्जाचे आश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्या विरुध्द गुन्हे दाखल करा : न्यायालयाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2019 8:31 PM
सामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या आरोपीस शासन होणे आवश्यक
ठळक मुद्देपोलिसांनी एक महिन्याच्या आत अहवाल सादर करावाप्रथम दर्शनी फसवणूक व बनावटीकरणाचा गुन्हा स्पष्ट होत असल्याचा युक्तिवाद