राजगुरुनगर : सर्व मोबाईल कंपन्यांनी आजीवन इनकमिंग मोफत असे भुलविले व आता इनकमिंग सुरू राहण्यासाठी प्रतिमाह शुल्क आकारत आहेत. याविरोधात ग्राहकांनी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोर यांनी केले.खेड तहसील कार्यालय, अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि अन्न नागरी पुरवठा व संरक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिन गुरुवारी (दि. २७) एसटी बसस्थानक आवारात साजरा करण्यात आला. यावेळी भोर बोलत होते. तहसीलदार सुचित्रा आमले यांनी विविध ग्राहकोपयोगी स्टॉल्सचे उद्घाटन केले.याप्रसंगी भूमी अभिलेख उपअधीक्षक उमेश झेंडे, आगारप्रमुख आर. जी. हांडे, एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी दुधाळकर, तालुकाध्यक्ष देवानंद बवले, सचिव विलास वाडेकर, कोषाध्यक्ष अवधूत प्रसादे,सहसंघटक विठ्ठल दौंडकर, विजयानंद जाधव, केशव शिंदे, संजय सुर्वे यांच्यासह विविध शासकीय कार्यालयांचे खातेप्रमुख व नागरिक उपस्थित होते.अशोक भोर यांनी यावेळी ग्राहक पंचायतीची वाटचाल विषद केली. अध्यक्षीय भाषणात तहसीलदार सुचित्रा आमले यांनी महसूल विभागाच्या विविध ग्राहकाभिमुख योजनांची माहिती दिली. ग्राहक पंधरवडा कार्यक्रमात विविध ठिकाणी शिबिरे घेऊन जनजागृती केली जाईल, असे सांगितले. ग्राहकांना सेवा पुरविण्याचे आवाहन त्यांनी केले.प्रदर्शनास उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद व गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार यांनी भेट दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत वितरण महामंडळ, पंचायत समिती, पशुसंवर्धन विभाग, भूमी अभिलेख कार्यालय, कृषी विभाग, परिवहन महामंडळ, पुरवठा शाखा, अन्न व औषध प्रशासन,वजन माप वैधता कार्यालय, महसूल विभाग, गॅस कंपनी, पाटबंधारे विभाग यांनी स्टॉल्स उभारून ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण केले.राष्ट्रीय ग्राहक कायद्याने ग्राहकाला राजाचा दर्जा प्राप्त झाला आहे. ग्राहकाने प्रत्येक विक्रेत्याकडे खरेदीची पक्की पावती मागावी जेणेकरून त्याला त्रिस्तरीय ग्राहक न्यायालयात दाद मागता येते. ग्राहक न्यायालयात ९० दिवसांत निकाल दिला जातो.- अशोक भोर, जिल्हा उपाध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत
मोबाईल कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा : अशोक भोर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 12:34 AM