पुणे : जे डब्ल्यू मॅरियट बाहेर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांविरोधात चतुर्श्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये रुपाली पाटील ठोंबरेंचाही समावेश आहे. काल स्मृती इराणी पुण्याच्या दौऱ्यावर होत्या त्यावेळी शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने मोठे आंदोलन केले होते. तसेच बालगंर्धव सभागृहात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाणही झाली होती.
देशातल्या वाढत्या महागाईमुळे काल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने सेनापती बापट रोड येथे आंदोलन करण्यात आले होते. स्मृती इराणी आज एका पुस्तक प्रदर्शनासाठी पुणे शहरात आल्या असता पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मार्गावर काळे झेंडे दाखवत, घोषणा देत स्मृती इराणी यांचा निषेध केला. याप्रसंगी " महागाईची राणी, स्मृती इराणी" , " स्मृती भाभी जवाब दो" , " बहुत हुई महागाई की मार,चले जाओ मोदी सरकार" या घोषणा दिल्या होत्या.
यावेळी प्रशांत जगताप म्हणाले होते की," स्मृती इराणी यांच्या महागाई विरोधी अभिनयावर विश्वास ठेवत ज्या सर्वसामान्य नागरिकांनी २०१४ मध्ये भाजपला मतदान केले त्या नागरिकांना स्मृती इराणी यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु गेल्या ७ वर्षात गॅस सिलेंडरची किंमत ३६५ वरून तब्बल १००२ वर गेल्याने नागरिकांचा मोदी सरकार वर रोष असल्याचे आंदोलनात पाहायला मिळत आहे. २०१४ साली याच भाजपने तत्कालीन पंतप्रधानांना महागाई साठी दोषी ठरवत बांगड्या पाठवल्या होत्या आज मात्र तत्कलिन परिस्थिती पेक्षा कितीतरी जास्त महागाई झाल्याने आजच्या पंतप्रधानांना देखील तीच भेट देण्याची वेळ आली आहे."
स्मृती इराणींच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला होता. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना भाजपकडून मारहाण झाली होती. या मारहाणीप्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भगव्या टोप्या घातलेल्यांनी मारले- वैशाली नागवडे