---
शिक्रापूर : सणसवाडी (ता. शिरूर) येथील शेताचे कंपाऊंड तोडून शेतात रस्ता करून व विहिरीतील पाणी नेल्याप्रकरणी तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पुणे जिल्हा परिषद बांधकाम समितीचे माजी सभापती पैलवान मंगलदास बांदल व त्याचा भाऊ व टँकर चालकावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी अधिक माहितीनुसार, या गुन्ह्यातील फिर्याद ज्ञानदेव गुलाबराव तनपुरे यांची सणसवाडी (ता. शिरूर) गावच्या हद्दीत दोन एकर जमीन आहे. विठ्ठलराव बांदल व बापूसाहेब विठ्ठलराव बांदल या दोघांनी या जमिनीतील दोन एकर क्षेत्रातील तारेचे कुंपण तोडून शेतातून चारचाकी वाहने जातील असा रोड तयार केला. तसेच शेतामध्ये पाण्याचा टॅंकर (एम.एच ०४ डीडी ४८४६) नेऊन जमिनी खराब केली. त्यामुळे मुलगा कैलास तनपुरे यांनी बापूसाहेब बांदल यांना फोन करून आमच्या शेतातून पाण्याचे टॅंकर नेऊ नका शेती खराब होत आहे, असे सांगितले. त्यावर बापू बांदल यांनी सांगितले की, मी व माझा भाऊ मंगलदास बांदल यांच्या मिळून दररोज सहा टँकर तुमच्या शेतातील विहिरीतून पाणी भरायला येतील आमचे टँकर तुझ्या शेतातून जाणार व तुमच्याच विहिरीतून पाणी नेणार तुमच्यात दम असेल तर अडवून दाखवा नाही, तुमचे हात पाय तोडले तर बांदल नाव सांगणार नाही. तुम्हाला तुमच्या शेतात अंगावर ट्रॅक्टर घालून गाडून टाकू, अशी जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
याबाबत फिर्यादी यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात मंगलदास बांदल व बापूसाहेब बांदल यांच्यापासून जीवितास धोका असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक किरण भालेराव करत आहे.