पुणे : नदी पात्रात बेकायदा वाळू उपसा केल्याचा प्रकार एसटीपी, औंध येथे रामनदी व मुळा नदीच्या संगमावर शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला होता. तेव्हा नदी संवर्धन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती देऊन संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करायला भाग पाडलेे. नदीला वाचविण्यासाठी नागरिक पुढे आल्याने यापुढे अवैध वाळू उपशावर आळा बसू शकतो.
गेल्या काही दिवसांपासून रामनदी व मुळा नदी पात्रातून वाळू अवैधरित्या घेऊन जात असल्याची माहिती जीवितनदीच्या सदस्या वैशाली पाटकर यांना समजली. त्यामुळे त्यांनी त्यावर लक्ष ठेवून शुक्रवारी रात्री वाळू नेताना संबंधिताला पकडले. त्यानंतर पोलीसांना बोलावले व गुन्हा दाखल करायला भाग पाडले. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी विजयकुमार छक्कम साव (वय २२, रा. टाकळी हाजी, मूळ रा. झारखंड), असे अटक आरोपीचे नाव आहे. साव याच्यासह त्याच्या इतर दोन साथीदारांवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वैशाली जयंत पाटकर (वय ४७, रा. औंध) यांनी फिर्याद दिली आहे. बांधकामासाठी वाळूचा वापर होत असल्याने त्याची मागणी वाढली आहे. परिणामी नदी पात्रातील अवैध उपसा मोठ्या प्रमाणावर होत आहे. अनिर्बंध वाळू उपशामुळे पर्यावरणाची मोठी हानी होते आणि शेवटी त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. अनिर्बंध वाळू उपसा करू नये म्हणून सरकारने काही नियम केलेले असतात. पण, या व्यवसायात अक्षरश: वाळुमाफिया तयार झाले आहेत.
वाळू उपशाचा नदी पात्रावर परिणामनदीपात्रात वाळू उपसा केल्यामुळे नदीची मोठी हानी होते. तसेच नदीपात्र आणि तिथल्या परिसंस्थेवर वाईट परिणाम होतात. नदीतून वाळूचा उपसा केल्यामुळे नदीच्या पाण्याच्या वेगात बदल होतो. पाण्याचा वेग वाढतो आणि त्यामुळे वाळू उपसा झालेल्या ठिकाणाच्या वरच्या बाजूला (उगमाच्या दिशेने) किंवा खालच्या बाजूला नदीपात्राची मोठ्या प्रमाणावर झीज होते. याचा परिणाम नदीकिनारे आणि जवळपासच्या भागातही पाहायला मिळतात.