पुणे : मौजे बालवाडी येथील जागेची आरटीएस फाईलची छायांकित प्रत देण्यासाठी तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी हवेली तहसीलदार कार्यालयातील अभिलेखा कक्षामधील कोतवालाविरुद्ध खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
सुवर्णा भोसले (वय ३४, कोतवाल, अभिलेख कक्ष, हवेली तहसीलदार कार्यालय) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. मौजे बालेवाडीच्या जागेची आर.टी.एस फाईलची छायांकित प्रत हवेली तहसीलदार कार्यालयातून मिळण्यासाठी तक्रादाराने अर्ज केला होता. मात्र अभिलेख कक्षामधील कोतवालाने त्यांच्याकडे २५ हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. यामध्ये १५ हजार रूपये व १ गुंठा जागेवर तडजोड केली. विभागाने सापळा रचून कोतवाल महिलेला १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले. या कोतवाल महिलेविरुद्ध खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक अलका सरग पुढील तपास करीत आहेत.