किर्ती प्रशांत डमरे यांचा २००७मध्ये प्रशांत प्रकाश डमरे (रा.मुंबई) यांच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर सहा महिन्यांनी प्रशांतला दारुचे व्यसन असल्याचे कळाले. याबाबत तिने सासू-सासरे नणंद यांना सांगितले. तुझा नवरा तुला सांभाळता येत नाही, त्यात आम्ही काही सांगणार असे म्हणत दुर्लक्ष केले. त्यानंतर प्रशांत डमरे यांनी वारंवार दारू पिऊन विवाहितेस मारहाण केली. त्यानंतर त्यांना दोन मुले झाल्यानंतरही मारहाण सुरू होती. आईकडून रेशनिंगसाठी पैसे घेऊन ये या कारणावरून उपाशीपोटी ठेवल्याने विवाहिता ही आपल्या माहेरी मंचर येथे आली होती. त्या नंतर २०१८ मध्ये विवाहितेचे चुलते व भाऊ यांच्या मध्यस्थीने वकिलामार्फत त्रास देणार नाही, अशी तिच्या पतीने नोटरी करून देत तिला पुन्हा घरी नेले. मात्र घरी गेल्यानंतरही काही दिवसांनी पतीला व्यसन लागल्याने त्याच्याकडून वारंवार त्रास व मारहाण केली जात होती. विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला. याबाबत तिने सायन पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविली होती. त्यानंतरही तिला वारंवार त्रास देण्यात आला. या छळाला कंटाळून ती मंचर येथे माहेरी निघून आली. त्यानंतर तिच्या पतीने तिला फोन करून तु घरी ये नाहीतर मी फाशी घेईल असे म्हणत धमकी व शिवीगाळ केली. या वारंवारच्या त्रासाला कंटाळून कीर्ती डमरे यांनी पती प्रशांत प्रकाश डमरे, सासू मालन प्रकाश डमरे, सासरा प्रकाश मारुती डमरे, नणंद सुवर्णा राहुल वाला यांच्याविरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
विवाहितेच्या छळ प्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:08 AM