पुणे : नाशिक येथील विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद नामदेव जाधव यांच्या विरुद्ध ज्ञात उत्पन्नापेक्षा २३ टक्के अधिक अपसंपदा बाळगल्याबद्दल भ्रष्टाचार पतिबंधक कायद्यानुसार चंदननगर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे़. त्यांच्याकडे २०१२ पर्यंत सुमारे २ कोटी रुपयांची मालमत्ता आढळून आली असून त्यापैकी ४६ लाख ८२ हजार ४०३ रुपयांचा (२३ टक्के) हिशोब त्यांना देता आलेला नाही़
रामचंद्र जाधव (वय ५७) हे सध्या नाशिक येथील विभागीय शिक्षण उपसंचालक म्हणून नेमणूकीला आहेत़. यापूर्वी ते पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक म्हणून कार्यरत होते़ त्यापूर्वी पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे तत्कालीन शिक्षण प्रमुख म्हणून काम केले आहे़. अनेकदा चुकीचे निर्णय घेतल्याने त्यांची पुण्यातील कारर्किद वादग्रस्त राहिलेली आहे़. त्यातूनच ते पुण्यात शिक्षण उपसंचालक असताना त्यांच्याविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे भष्ट्राचाराच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या़.
त्यातून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याविषयी गुप्त चौकशीला सुरुवात केली होती़. प्राथमिक चौकशीत त्यांच्याकडे भष्ट्राचारातून मिळविलेली मालमत्ता असल्याचे आढळल्यावर त्याविषयी उघड चौकशीचा प्रस्ताव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे युनिटने वरिष्ठांकडे पाठविला़. त्याला २०१४ मध्ये मान्यता मिळून त्यांची उघड चौकशी सुरु करण्यात आली़. त्यानंतर १५ जून १९८५ पासून ते ३१ मार्च २०१२ पर्यंतच्या त्यांच्या सेवा काळातील मालमत्तेची उघड चौकशी करण्यात आली़.
त्यांची पुणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर येथे मालमत्ता आढळून आली़. या कालावधीत त्यांच्या ज्ञात स्त्रोतातून मिळालेल्या उत्पन्नापेक्षा ४६ लाख ८२ हजार ४०३ रुपयांचा हिशोब त्यांना देता आला नाही़. त्यामुळे त्यांनी ही रक्कम भ्रष्ट मार्गाने मिळविली असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम २०१८ नुसार चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे़.
याप्रकरणी सहायक पोलीस आयुक्त दत्तात्रय भापकर यांनी फिर्यादी दिली असून सहायक पोलीस आयुक्त वर्षाराणी पाटील अधिक तपास करीत आहेत़.रामचंद्र जाधव यांच्या उत्पन्नांची ३१ मार्च २०१२ पर्यंतची तपासणी आतापर्यंत करण्यात आली असून आता पुढील तपासात त्यानंतरच्या कालावधीची चौकशी करण्यात येणार आहे.
पुणे विभागात ६० प्रकरणाची चौकशी सुरु
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागामार्फत अपसंपदा आणि अन्य भ्रष्टाचाराच्या सुमारे ६० प्रकरणाची सध्या उघड चौकशी सुरु आहे, असे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी सांगितले़ . भ्रष्टाचाराविषयी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे वेगवेगळ्या योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याविषयी तसेच शासकीय अधिकाºयांच्या अपसंपदाविषयी तक्रारी येत असतात़ त्याविषयी गुप्तपणे प्राथमिक तपास करण्यात येतो़ त्यात तथ्य आढळून आल्यास उघड चौकशीसाठी परवानगी घेण्यात येते़ सध्या अशा अन्य भष्ट्राचार व अपसंपदा अशा दोन्ही बाबतच्या सुमारे ६० प्रकरणाची चौकशी केली जात असल्याचे दिवाण यांनी सांगितले़.