लोणी काळभोर - कीटकनाशकांची विनापरवाना वाहतूक व साठवणूक करणे. बनावट लेबल लावून मुदतबाह्य झालेली कीटकनाशके विक्रीकरिता साठवलेली आढळून आल्याने व सदर कीटकनाशके प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर अप्रमाणित म्हणून अहवाल आल्यानंतर मुलूंड (मुंबई) येथील कीटकनाशक उत्पादन करणाऱ्या कंपनीचे मालक व संचालक आणि कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील कीटकनाशक विक्रेत्यावर कीटकनाशक कायदा व अधिनियमअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी प्रभारी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सत्यजित शितोळे (वय ३०, रा. ३०५ रूद्र सोसायटी, केसनंद फाटा, वाघोली, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामश्री केमिकल्स, विकास पॅरडाईजजवळ, मुलूंड (पश्चिम) या कीटकनाशक कंपनीचे मालक व संचालक तसेच कुंजीरवाडी येथील मे. म्हातोबा जोगेश्वरी शेती भंडार या दुकानातील कीटकनाशक विक्रेते दत्तात्रय जवळकर रा. (कुंजीरवाडी) यांच्यवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सत्यजित शितोळे यांच्यासमवेत गुणनियंत्रक तज्ज्ञ अधिकारी व हवेली पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांनी १९ मार्च २०१८ रोजी दुपारी बाराच्या सुमारास कुंजीरवाडी येथील दत्तात्रय जवळकर यांचे मे. म्हातोबा जोगेश्वरी शेती भंडार या कीटकनाशक विक्री केंद्राची व गोडाऊनची तपासणी केली असता तेथे त्यांना रामश्री केमिकल्स या कंपनीचे अॅमिनी सॉफ्ट या कीटकनाशकाचे २०० लिटरचे ६ ड्रम, ग्लायफोसेटचे ५०० मिलीलिटरचे ८० नग, आणी झुआरी अॅग्रो केमिकल्स लिमिटेड, गोवा या कंपनीचे ४० लिटर कीटकनाशक मिळून आले होते. या दुकानाचा विक्री परवाना तपासला असता सदर औषधे विक्री करण्याचा परवान्यामध्ये समावेश नसल्याचे आढळून आले.चौकशीत या पथकाला रामश्री केमिकल या कंपनीस या कीटकनाशक उत्पादनास महाराष्ट्र राज्यात विक्री करण्याचा परवाना नसल्याचे दिसून आले. गोडाऊनमध्ये असलेल्या औषधांची पाहणी केली असता त्यांना ती मुदतबाह्य झालेली तसेच तेथील २० बाटल्यांवरील लेबल फाडलेले असल्याचे दिसून आले. तसेच तेथे लेबल छापायचे मशिन, बॉक्स व थिनर आढळून आले. यांमुळे या बाटल्या रिलेबलिंग व रिपॅकिंग केल्याचे दिसले. ड्रममधील कीटकनाशक पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यांचा अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कीटकनाशक कंपनी व विक्रेत्यावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 2:27 AM