विमाननगर : लग्नसराईत डीजे बँडबाजाच्या वरातींमुळे किवा पार्किंगच्या वाहनांमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली, तर पोलिसांकडून आता थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. शहरातील वाढती वाहनांची संख्या, रस्त्यावरील विविध अडथळे, तसेच बेशिस्तपणे केली जाणारी वाहनांची पार्किंग यामुळे अनेक ठिकाणी कोंडीची मोठी समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. मंगल कार्यालयचालकांना वेळोवेळी सूचित करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या विश्रांतवाडी विभागातील तीन मंगल कार्यालयचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त महादेव गावडे यांनी दिली. याप्रकरणी विजय रामचंद्र भिसे, सुदर्शन सुनील वावळ, शरद परशुराम साकोरे यांच्याविरुद्ध सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण करून पादचाऱ्यांना चालण्यासाठी अडथळा व त्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्याबद्दल भादंवि कलम २८३ व २९१ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे, सहायक पोलीस आयुक्त महादेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रांतवाडी विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक सी. व्ही. केंद्रे व कर्मचारी यांनी ही कारवाई करून गुन्हे दाखल केले. शहरातील वाढत्या वाहतूककोंडीच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर आगामी काळातही अशा प्रकारे लग्नसोहळ्यातील वरातींमुळे वाहतूककोंडी झाल्यास गुन्हे दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंगल कार्यालयाबाहेर होणाऱ्या कोंडीमुळे वाहतूक विभागाकडून कार्यालयाच्या चालक व मालक यांना वेळोवेळी सूचित केले जाते. कार्यालयातील येणाऱ्या वाहनांची पार्किंग अस्ताव्यस्त करून दिघी मॅगझीन चौक ते भोसरी रोडवर प्रचंड वाहतूककोंडी केल्याप्रकरणी हिरा लॉन्स, राम स्मृती मंगल कार्यालय व माऊली लॉन्सच्या व्यवस्थापकांवर विश्रांतवाडी वाहतूक विभागाने गुन्हे दाखल केले.
वाहतूककोंडी कराल तर होतील गुन्हे दाखल!; पुणे पोलिसांचा मंगल कार्यालयांना इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:19 PM
डीजे बँडबाजाच्या वरातींमुळे किवा पार्किंगच्या वाहनांमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली, तर पोलिसांकडून आता थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.
ठळक मुद्दे विश्रांतवाडी विभागातील तीन मंगल कार्यालयचालकांवर गुन्हे दाखलवाढत्या वाहतूककोंडीच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर आगामी काळातही करणार गुन्हे दाखल