बारामती : आपल्या दिव्य ज्योतीतून अंध:कार दूर सारून मांगल्याचा प्रकाश देणाऱ्या पणत्या सध्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. प्रकाशाचा उत्सव म्हणून ओळखला जाणारा दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळी म्हटलं, की दिव्यांची आरास ओघाने आलीच. प्रत्येक जण आपल्या अंगणात सुंदर दिव्यांची आरास करण्यासाठी वेगवेगळ््या प्रकारच्या पणत्या खरेदी करीत असतो. पणत्या खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत ग्राहक गर्दी करीत आहेत. ‘दीप उजळू दे, अंधार पळू दे, प्रकाशाने आसमंत झळाळू दे...’ असा संदेश देणाऱ्या या पणत्या खऱ्या अर्थाने ज्ञानज्योती आहेत. यंदाही गुजरात, कोलकत्ता, राजस्थान, सिलीगुडीच्या पणत्यांनी दीपावली दीपून जाणार आहे. यासाठी सहाशेहून अधिक पणत्यांचे प्रकार बाजारामध्ये विक्रीला उपलब्ध आहेत. पश्चिम बंगाल, नेपाळ, गोरखपूर, गुजरात, कोलकत्ता, राजस्थानी टेराकोटा आदी ठिकाणांहून या पणत्या बारामती शहरातील बाजारपेठेमध्ये विक्रीस आलेल्या दिसतात. या पणत्या पाहताना नागरिक हरखून जात आहेत. १५ रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत प्रतिडझन दराने पणत्या विक्रीस आहेत. यामध्ये २ रुपयांपासून २ हजार रुपयांपर्यंतच्या पणत्या आणि दीपमाळ ग्राहकांचे आकर्षण ठरत आहेत. मंदिर, घर, वृक्ष आदी स्वरूपात विक्रीस आलेल्या पणत्या बारामतीकरांचे लक्ष वेधून घेत आहेत. चिकनमाती विशिष्ट असल्याने कोणतीही कलाकुसर बनवून तयार केलेली पणती या कोलकत्ता पणतीचे वैशिष्ट्य असल्याचे येथील विक्रेत्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) - बासरी पणती, हँगिंग घंटी पणती, मोर पणती, छाकण्याचे दिवे, मातीचे आकाशकंदील, जादूचे दिवे, लक्ष्मीपूजनासाठीचे रंगीबेरंगी बोळके, ‘रेडिमेड’ किल्ले, दीपमाळ, सुपाची पणती, कासव पणती, कलश पणती, सिंहासन पणती, आठ दिवा, नऊ दिवा, थाळी पणती, भिंतीवर टांगण्यासाठी असलेल्या त्रिशूल, झाड, ओम, हॅपी दिवाळी पणती, लामणदिवे, लोंबकळणाऱ्या पणत्या, हत्ती पणती, झाकणाची पणती, कंदील पणती, छत्री पणती, नारळ पणती, मंदिर पणती, तुळशी पणती आदी प्रकार पाहून ग्राहक खरेदी करीत आहेत.
मांगल्याचे प्रकाशदीप बाजारपेठेत दाखल
By admin | Published: October 22, 2016 3:45 AM