सासवड : वारंवार नकार देऊन आणि समजावून सांगूनही त्याकडे दुर्लक्ष करणे आणि अल्पवयीन मुलीची छेड काढून तिच्याकडे प्रेमाची मागणी करणाºया एका सडकसख्याहरीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित मुलीच्या आईने याबाबत फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी बाललैंगिक अत्याचारांतर्गत मारुती रोहिदास शेंडकर (रा. शेंडकरवस्ती, सोमुर्डी, ता. पुरंदर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : सविस्तर वृत्त असे : संबंधित अल्पवयीन मुलगी इयत्ता ९ वीमध्ये एका विद्यालयात शिक्षण घेत असून आरोपी मारुती शेंडकर सुमारे दोन महिन्यांपासून तिला त्रास देत होता. त्यावेळी मुलीच्या घरच्यांनी त्यास समजावून सांगून सोडून दिले होते. त्यानंतरही तो थेट शाळेसमोर येऊन बसत होता व शाळेच्या बाहेर आल्यावर वेळोवेळी हातवारे करून इशारे देत होता. शनिवारी (दि. १५) संबंधित मुलगी शाळा सुटल्यानंतर तिच्या मैत्रिणीसोबत रस्त्याने पायी घरी जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला व तिचा हात ओढला, तसेच जवळ आणलेला चाकू काढून माझे तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, तू मला होकार दे नाही तर हाताची नस कापून आत्महत्या करीन, अशी धमकी दिली. त्यावेळी हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. त्याचदिवशी सायंकाळी परत फिर्यादीस त्रास दिल्याने मुलीने आईला ही बाब सांगितली. तसेच वडिलांना फोन करून याबाबत कल्पना दिली. त्यानंतर सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक मुगुटलाल पाटील आणि सहायक पोलीस निरीक्षक चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सावंत याबाबत अधिक तपास करीत आहेत, अशी माहिती ठाणे अंमलदार पोलीस हवालदार घाडगे यांनी दिली.