पुणे : खराडी ॲग्रो ट्रेडिंग कंपनीचा विकसन करारनामा बनावट कागदपत्रांच्या आधारे रद्द करुन ती जमीन दुसऱ्या कंपनीला विक्री करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी हानिफ सोमजी, अल्नेश सोमजीसह चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २००८ ते २०१३ दरम्यान वडगाव शेरी येथे घडला आहे.
हानिफ सोमजी, सोहेल सोमजी, अल्नेश सोमजी, जेनिस सोमजी (सर्व रा. बोट क्लब रोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी खराडी ॲग्रो ट्रेडींग कंपनीचे संचालक इकबाल मस्तान शेख (वय ३७, रा. हडपसर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार वडगाव शेरी येथे २००८ ते २०१३ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे खराडी ॲग्रो ट्रेडिंग कंपनीचे संचालक होते. कंपनीने त्यांना २०१० साली संचालक पदावरून कमी करण्यात आले. यानंतर या कंपनीचे निझार मेवानी व नुरजहा मेवानी हे संचालक होते. फिर्यादी हे २०१५ मध्ये कंपनीचे संचालक झाले. दरम्यान कंपनीने हनिफ सोमजी याच्याकडून वडगाव शेरी येथील ६.६ आर जमीन विकसन करारनामा करून घेतली होती. हा करारनामा कंपनीच्यावतीने अल्नेश सोमजी याने केला होता. या मोबदल्यात कंपनीने हानिफ सोमजी याला ३३ लाख रुपये दिले. त्यानंतर हनिफ सोमजी याने कंपनीच्या नावाने दस्त लिहून दिला होता.
त्यानंतर २०१३ मध्ये हानिफ सोमजी आणि सूर्या रियालिटी प्रा. लि. यांनी मिळून फिर्यादी यांच्या कंपनीने खरेदी केलेली जमीन शाम मानकर व इतर भागीदारांना विकली. हानिफ सोमजी याने कंपनीच्या वतीने दस्तावर सही केली. यासाठी आरोपींनी संगनमत करून दस्त करून देताना कंपनीचे कुलमुख्यत्यारपत्र रद्द केले. फिर्यादी यांनी खरेदीखत पाहिले असता हानिफ सोमजी, सोहेल सोमजी यांनी सूर्या रियालिटी तर्फे संमती देणार म्हणून सही करून त्याचे नातेवाईक अल्नेश सोमजी, जेनिस सोमजी यांनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांच्या कंपनींची जमीन शाम मानकर व त्यांचे भागीदार यांना विकून फिर्यादी यांची लाखो रुपयांची फसवणूक असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे अधिक तपास करीत आहेत.