पुणे : बारामती आणि मावळ लोकसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. मात्र, पुण्यातील महायुतीच्या उमेदवाराचा अर्ज भरतेवेळी या तिघांनीही पाठ फिरवल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अर्ज भरतेवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवर्जून हजेरी लावली. याची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात रंगली होती.
तिघांची अनुपस्थिती -
बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीतर्फे निवडणूक लढविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार तसेच रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले, महायुतीतील सर्व घटक पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्याच पद्धतीने मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतानाही शिंदे, फडणवीस व पवार यांनी हजेरी लावली होती. मात्र, पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या अर्ज भरतेवेळी या तिघांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली.
संदेशातून माहिती-
अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी मोहोळ यांच्यासोबत शिंदे फडणवीस व पवार हे तिघेही असतील अशा स्वरूपाचे संदेश सामाजिक माध्यमांमधून पोहोचविण्यात आले होते. त्यात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जमण्याचे आवाहन करण्यात आले होते.
स्थानिक नेत्यांची हजेरी -
मोहोळ यांनी कोथरूडपासून शक्तिप्रदर्शनाला रॅलीने सुरुवात केली. रॅलीच्या मध्यतरी केवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही काळ हजेरी लावली फडणवीस खंडोजीबाबा चौकात सभेला संबोधित करणार होते. मात्र, जळगाव येथील नियोजित सभेला जायचे असल्याने त्यांनी रॅली अर्धवट सोडून देण्यास पसंती दिली. परिणामी, मोहोळ यांना अर्ज दाखल करतेवेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर हेच उपस्थित होते. मोहोळ यांचे चार अर्ज भरण्यास वेळ लागणार असल्याने थोड्या-थोड्या अंतराने विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे आले. त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी हजेरी लावली. यावेळी आठवले येणार असल्याचे सांगण्यात आले होेते. मात्र, आठवलेही यांनीही पाठ फिरवली. परिणामी नेत्यांच्या अनुपस्थितीत मोहोळ यांना अर्ज भरावा लागला.
राजकीय चर्चांना उधाण-
शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील व मुरलीधर मोहोळ हे एकाच वेळी अर्ज भरणार होते. मात्र, मोहोळ यांना उशीर होत असल्याचे दिसतात आढळराव हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी पवार, आमदार दिलीप मोहिते, अतुल बेनके, चेतन तुपे यांच्या उपस्थितीत अर्ज भरला. आठवले येणार अशी शक्यता असल्याने आढळराव पाटील यांनीही बराच वेळ जिल्हाधिकारी कार्यालयात घालवला. मात्र, त्यानंतर ते निघून गेले. राज्यात यापूर्वी झालेल्या दोन टप्प्यांसाठी महायुतीच्या महत्त्वाच्या उमेदवारांसाठी या तिन्ही नेत्यांनी हजेरी लावली होती. मात्र, पुण्यातील त्यांची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.