लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: सोलापूरकरांची बैठक वेगळ्या कारणासाठी होती. पालकमंत्री बदलण्यासाठी नाही, त्यामुळे दत्तात्रय भरणेच सोलापूरचे पालकमंत्री राहतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीच्या सोलापूरमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मंगळावारी दुपारी निसर्ग मंगल कार्यालयात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत बैठक झाली. मात्र, त्यात भरणे यांंना बदलण्याचा विषयच नव्हता असे पाटील म्हणाले.
पाटील म्हणाले, ‘सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पवार यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यात जिल्ह्यातील पक्षवाढीची चर्चा झाली. त्याचे नियोजन करण्यात आले. पक्षाध्यक्ष म्हणून पवार यांनी काही सूचना केल्या. कामाविषयी मार्गदर्शन केले.
उजनी धरणातील पाण्याच्या वापरातून निर्माण होणारे सांडपाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी शेटफळगढे येथे मुठा उजवा कालव्यात सोडणारी योजना प्रस्तावित होती. धरणातील पाणीच उचलले जाणार असल्याची टीका करून सोलापूरमधून या योजनेला विरोध झाला. त्याबरोबर पालकमंत्री असलेले भरणेच यामागे आहेत, असा आरोप होऊ लागला. त्यातूनच त्यांना बदलण्याची मागणी होऊ लागली. वाद वाढणार हे लक्षात आल्यावर पाटील यांंनी योजनाच रद्द केली. आता भरणे हेच पालकमंत्री राहतील, असे स्पष्ट करत त्यांनी वाद संपुष्टात आणण्याचा आदेशच सोलापूरमधील पदाधिकाऱ्र्यांना दिला असल्याची चर्चा आहे.