पुणे : अकरावी प्रवेशाचा अर्ज भरण्यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांना सायबर कॅफेत जावे लागत हाेते. त्यासाठीचे शुल्क भरण्याबराेबरच तासन्तास प्रतीक्षा करावी लागत हाेती. हा त्रास कमी करण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशाकरिता माेबाइल ॲप उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालक घरबसल्या केव्हाही अर्ज भरू शकतील.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. यात आत्तापर्यंत पिंपरी-चिंचवड परिसरातील ४८ हजार ४१९ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरला असून, त्यातील २६ हजार ६३२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरून लॉक केला आहे. २१ हजार २७२ विद्यार्थ्यांचे अर्ज व्हेरिफाय केले आहेत.
पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील सुमारे एक लाख विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरतात. सर्वच विद्यार्थ्यांच्या घरी संगणक व इंटरनेटची सुविधा असतेच असे नाही. त्यामुळे अनेकांना सायबर कॅफेमध्ये जाऊन अर्ज भरावा लागतो. बऱ्याचदा सायबर कॅफे चालकाने आमचा अर्ज भरला, आम्हाला यातले काही माहीत नव्हते, त्याने चुकीची माहिती भरली, अशा तक्रारी पालकांकडून केल्या जातात. मात्र, आता अर्ज भरण्यासाठी सायबर कॅफेमध्ये जाण्याची आवश्यकताच राहिली नाही.
असा भरला जाताेय अर्ज
- अकरावी प्रवेशासाठी प्रोसेस ऑफ ईलेवंथ ॲडमिशन इन महाराष्ट्र (poeam) हे मोबाइल ॲप ‘प्ले स्टोरेज’वर मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. या ॲप वरून आत्तापर्यंत राज्यातील ९७ हजार ६१७ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरला आहे.
- प्रवेश अर्ज केलेल्यांमध्ये मुंबईतील विद्यार्थ्यांची संख्या ६२ हजार ६७०, पुण्यातील विद्यार्थी संख्या २६ हजार ५४५, नाशिकमधील ४ हजार ३५; तर नागपूरमधील ३ हजार ६३१ विद्यार्थी आहेत.