लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महापालिका हद्दीत दहा लाखांपेक्षा जास्त मिळकतकर थकबाकी असणाऱ्या तब्बल ३६ शैक्षणिक संस्था आहेत. या संस्थांना वारंवार मिळकतकर भरण्याचे आवाहन महापालिकेने केले. मात्र, त्याला प्रतिसाद न दिल्यामुळे करसंकलन विभागाने बुधवारपासून जप्तीची व टाळे ठोकण्याची कारवाई सुरू केली आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच (गुरुवारी) काही थकबाकीदार संस्थांनी तातडीने सुमारे ६० लाखांची भरणा केला. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत दहा लाखांपेक्षा जास्त मिळकतकर थकबाकी असलेल्या तळवडेतील सरस्वती विद्यालयास पिंपरी महापालिकेच्या करसंकलन विभागाने टाळे ठोकले. कारवाईच्या भीतीने भरणा वाढला असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. आज कारवाईचा दुसरा दिवस होता. करसंकलन विभागाचे सह आयुक्त दिलीप गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप खोत, नाना मोरे, अमर तेजवानी व औदुंबर तुपे, तसेच वैभवी गोडसे, सहायक मंडलाधिकारी अरुण पासलकर, रामदास लोखंडे यांनी मिळकत जप्तीचे कामकाज केले.मिळकत जप्त केलेल्या शैक्षणिक संस्थांनी मिळकतकराची थकबाकी न भरल्यास मिळकतींचा लिलाव करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी भोसरीतील रंगनाथ शिक्षण विकास मंडळाच्या भैरवनाथ शाळा, शाहूनगर येथील अभिषेक विद्यालयास टाळे ठोकले होते. ताथवडेमधील जयवंत इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडीजचे ब्लॉसम पब्लिक स्कूल व काळेवाडीमधील बेबीज् इंग्लिश स्कूलने मार्चअखेरची थकबाकी अनुक्रमे १५ लाख ७७ हजार ७८४ रुपये व १६ लाख ७४ हजार ६५० असे एकूण ३२ लाख ५२ हजार ४३४ रुपये भरणा केला आहे.आजच्या कारवाईत तळवडे येथील सरस्वती विद्यालयाला (थकबाकी ४६ लाख) टाळे ठोकले. कारवाई टाळण्यासाठी तळवडेतील रुपीनगर शिक्षण संस्था (१० लाख), चिखलीतील गणगे प्रशाला (९.१८ लाख) आणि दिघी रोड येथील आदर्श बालक मंदिराने (६.९० लाख) एकूण २६ लाखांची थकबाकी भरली. या आठवड्यात ६० लाख जमा झाले.
टाळे ठोकण्याच्या भीतीने संस्थांचा ६० लाखांचा भरणा
By admin | Published: May 26, 2017 6:14 AM