बारामती : दिवसेंदिवस उन्हाळा तीव्र होत आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती प्राथमिक शिक्षक संघाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभुमीवर पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळा एप्रिल महिन्यामध्ये सकाळी भरवण्याची मागणी शिक्षक संघाने जिल्हा परिषदेकडे केली आहे. याबाबत शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी माहिती दिली.
कोरोनामुळे मागील वर्षी शाळा बंद असल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले. या स्थितीमध्ये शिक्षकांनी ऑनलाईन अध्यापन तसेच आपत्ती व्यवस्थापनाची सर्वेक्षण, कोविड केंद्र यांसारखी जबाबदारी पार पडली आहे. एप्रिल महिन्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढली असल्याने दुपारच्या वेळी उकाडा प्रचंड वाढला आहे. शालेय कामकाजाच्या पूर्ण तासिका घेऊन शाळेच्या वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य जिल्हा परिषदांना राज्य शासनाने दिले आहे. सकाळच्या वेळी शाळा घ्यावयाची असल्यास पूर्णवेळ शाळेचे नियोजन करून शाळा सकाळी भरविण्यास अनुमती देण्यात आलेली आहे. राज्यातील कोल्हापूर, सोलापूर,सांगली, सातारा, यवतमाळ बुलढाणा यांसह बहुतांश जिल्हा परिषदांनी दरवर्षीप्रमाणे सकाळच्या शाळेचे नियोजन केलेले आहे. पुणे जिल्ह्यातही सकाळी ७ ते १२ या वेळेत शाळा भरविण्याची मागणी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षण विभागाकडे केली असल्याची माहिती सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली.