पुणे : भंडारा येथील रुग्णालयाचे वेळीच फायर ऑडीट झाले असते तर दहा बालकांचा जीव गेला नसता. तसेच रुग्णालयातील अनेक पदेही रिक्त आहेत. त्यामुळे राज्यभरातील रुग्णालयातील रिक्त पदे भरणे, सर्व रुग्णालयांचे फायर ऑडीट करणे आणि दर्जेदार सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी जनआरोग्य अभियानतर्फे करण्यात आली आहे.
भंडारा जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांसाठीच्या अतिदक्षता कक्षाला लागलेल्या आगीत १० बालकांचा मृत्यू झाला. या घटनेमध्ये बालकांच्या अतिदक्षता विभागामध्ये १७ बालकांमागे दोन परिचारिका होत्या. आग लागली तेव्हा युनिटमध्ये एकही कर्मचारी नव्हता. मनुष्यबळाचा तुटवडा ही समस्यादेखील या घटनेला कारणीभूत आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये सर्व रुग्णालये मिळून एकूण ९२७ विविध पदे मंजूर आहेत यातील ३१७ पदे रिक्त आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या बालरोग परिचारिका स्थायी तीन पदे मंजूर आहेत परंतू एकही भरले नाही. यामुळे कामांचा अतिरिक्त ताण आहे.
बालकांच्या अतिदक्षता विभागामध्ये दर १२ बालकांमागे २१ परिचारिका हव्यात. त्यामुळे सर्व जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरावीत. दर्जेदार सोयी-सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर, पुरेसे मनुष्यबळ, मोफत औषधे यासाठी यावर्षीच्या आरोग्य बजेटमध्ये २२ हजार ६०० कोटी रुपयांची वाढ करावी, सर्व जिल्हा रुग्णालयाचे फायर आॅडिट येत्या दोन महिन्यांमध्ये करण्यात यावे या मागण्या अभियानचे डॉ. अनंत फडके, डॉ. सतीश गोगुलवार, डॉ. अभिजीत मोरे, शंकर पुजारी, डॉ. शशिकांत अहंकारी आदींनी केल्या आहेत.
ृ------------