टाकवे बुद्रूक : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आल्याने टाकवे-वडेश्वर गणात इच्छुक उमेदवारांनी गावागावांत बैठका घेऊन नातेवाइकांच्या गाठीभेटी घेऊन इच्छुकांनी उमेदवारानी मोर्चेबांधणीस सुरुवात केलेली दिसून येते. या गणात आंदर मावळ ,नाणेमावळचा समावेश असल्याने पंचायत समिती व जिल्हा परिषद उमेदवारांची चांगलीच धावपळ होणार आहे. या गणात पंचायत समिती सर्वसाधारण पुरुष, तर जिल्हा परिषद सर्वसाधारण महिला असून, तसेच पंचायत समिती सभापती सर्वसाधारण असल्याने या गणात चुरस लढाई होणार असल्याचे चित्र दिसून येते. तालुक्यातील हा सर्वात मोठ गण असून, त्या सर्वसाधारण पुरुष/महिला असल्याने तालुक्यातील सर्व पदाधिकारी या गणात जातीने लक्ष घालत असल्याचे दिसून येते. या गणात जिल्हा परिषदेसाठी ५२,७३२ मतदार, तर टाकवे गटात पं.स.साठी२८,६०६ मतदार तर वडेश्वर गटात २४,१२६ मतदार संख्या आहे.या गणात २० वर्षांपासून राष्ट्रवादीचे उमेदवार जिंकत असल्याने राष्ट्रवादीचा तालुक्यात हा बाल्ोकिल्ला समजला जात आहे. राष्ट्रवादीची ही परंपरा मोडण्यासाठी भाजपाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. सध्या या गणात पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी तालुक्यातील नेते नियोजन आखू लागले आहे. जनता कोणत्या पक्षात कोणाला उमेदवारी दिली जाईल, असा अंदाज आहे.टाकवे गणात नवलाख उंब्रे व टाकवे बुद्रुक या दोन्ही गावांत मतदारसंख्या अधिक असल्याने येथील गावातच उमेदवार देणार असल्याची चर्चा सर्वत्र आहे. मात्र राष्टवादीत शिवाजी असवले व दत्ता पडवळ हे पंचायत समितीसाठी तीव्र इच्छूक आहे.शिवाजी असवले यांना पक्षाने तिकीट दिले तर दत्ता पडवळ अपक्ष लढणार असल्याचे चर्चासत्र सुरु आहे. तर शिवाजी असवले यांना पक्षाकडून तिकीट नाही, मिळाले तर आंदरमावळातील हजारो कार्यकर्ते नाराज होतील.तालुक्यातील पदाधिकारी भाजपा संघटक मंत्री मावळ तालुका शांताराम कदम, राष्ट्रवादीतील पुणे जिल्हा बॅकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, तर शिवसेना तालुकाप्रमुख राजू खांडभोर याच गणात असल्याने त्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली असल्याचे दिसून येते. (वार्ताहर)
इच्छुकांचा गाठीभेटीवर भर
By admin | Published: January 11, 2017 3:09 AM