लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण बंद केले जाणार नाही, अशी ग्वाही देत ‘चित्रीकरण कमीत कमी लोकांमध्ये करावे, गर्दी होईल अशी दृश्ये चित्रित करू नये, चित्रीकरणासाठी जागा निवडताना शक्यतो दाट लोकवस्तीची ठिकाणे टाळावीत’ व चित्रपट आणि मालिकेशी संबंधित सर्वांचे लसीकरण झाले आहे की नाही ते पाहावे अशा सूचना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निर्मात्यांसह अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला दिल्या आहेत.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मालिका आणि चित्रपटांच्या चित्रीकरणाबाबत राज्य सरकारसमवेत कलाकार, निर्माते दिग्दर्शकांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी सांस्कृतिक क्षेत्रातील विविध युनियन, महामंडळाचे सदस्य, दिग्दर्शक, कलाकार आणि निर्मात्यांशी चर्चा केली.
सर्वांनी योग्य ती कायदेशीर परवानगी घेऊनच चित्रीकरण करावे, चित्रीकरण चालू असताना लोकेशन सोडून इतरत्र जाऊ नये, चित्रीकरणाची जागा सॅनिटाइज करावे, सेटवर आरोग्य तपासणी करावी, त्याची रोजची नोंद ठेवावी, कलाकार सोडून इतरांनी मास्क वापरणे बंधनकारक असण्यासह कलाकारांनीही आपला शॉट झाला की मास्क लावणे आणि पर्यावरणपूरक साहित्य चहा, नाष्टा, जेवण यासाठी वापरावे, डॉक्टर सेटवर असणे आवश्यक आहे आणि कंटेन्मेंट झोनमधील व्यक्तीला चित्रीकरणाला बोलावू नये, अशा सूचना केल्याची माहिती अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिली.
खबरदारी घेण्याची जबाबदारी सर्व निर्मात्यांची
कोरोनाच्या काळात हाताला काम नसल्यामुळे अनेक कलाकारांचे हाल झाले. आत्ता शासनाने चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणाला परवानगी दिली असली तरी पुन्हा बंदच्या निर्णयाची टांगती तलवार असू शकते. या निर्माते, कलाकारांना वाटणाऱ्या भीतीच्या पार्श्वभूमीवर चित्रीकरण बंंद केले जाणार नाही असे सांगून मुख्यमंत्र्यांनी सर्वांनाच दिलासा दिला. मात्र चित्रीकरणाच्या वेळी सर्व प्रकारची खबरदारी घेण्याची जबाबदारी सर्व निर्मात्यांनी घेतली पाहिजे व यावर विविध संघटनांनी लक्ष ठेवावे, असेही सांगण्यात आले.