लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आयसीएआयच्या पश्चिम विभागीय पुणे शाखेच्या वतीने आयोजित आठव्या बीस्मार्ट सीए आंतर फर्म क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत सागर संकलेचा (३-१६) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर एसआरपीए इलेव्हन संघाने रॉयल्स संघाचा २२ धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले.
मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूल मैदानावर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एसआरपीए इलेव्हन संघाने १० षटकांत ६ बाद ११५ धावा केल्या. यात अमन अग्रवाल ४४, पार्थ पडिया २३, आनंद डायमा २२ यांनी धावा डावाला आकार दिला. ‘रॉयल्स’कडून निपुण भंडारी २-३५, शंतनू जमादार (१-१५), कुणाल झामवर (१-१७) यांनी सुरेख गोलंदाजी केली. प्रत्युत्तरात रॉयल्स संघ १० षटकात ८ बाद ९३ धावाच करू शकला. यात सौरभ सोनी ३२, कुणाल झामवर १४, समीर बिर्ला १२ यांनी थोडासा प्रतिकार केला. एसआरपीए इलेव्हन संघाकडून सागर संकलेचा (३-१६), आनंद डायमा (२-६), अजित पवार (२-१६) यांनी अफलातून गोलंदाजी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सामनावीर सागर संकलेचा ठरला. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत साहिल पारख (नाबाद ४६ व ३-१२)याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर बीस्मार्ट संघाने चॅम्प्स सुपर किंग्ज संघाचा १० गडी राखून पराभव करत तिसरा क्रमांक पटकावला.
विजेत्या संघाला करंडक व आकर्षक पारितोषिके देण्यात आली. पारितोषिक वितरण बीस्मार्टचे संचालक डी. एन. पांचाळ, सी. व्ही. चितळे, आयसीएआयच्या पश्चिम विभागीय पुणे शाखेचे अध्यक्ष अभिषेक धामणे, उपाध्यक्ष समीर लड्डा आणि कॉसमॉस बँकेचे संचालक यशवंत कासार यांच्या हस्ते झाले. सीए योगेश पोद्दार, सीए सचिन पारख, सीए सुमित शहा, सीए सचिन पारकले, सीए अमोल चंगेडिया, सीए अक्षय पुरंदरे, सीए आनंद गावडे, सीए राजेश मेहता, सीए अल्पेश गुजराथी आणि सीए भूषण शहा आदी उपस्थित होते.
अन्य पारितोषिके :
सर्वोत्कृष्ट फलंदाज : सौरभ सोनी (१७१धावा, रॉयल्स)
सर्वोत्कृष्ट गोलंदाज : सागर संकलेचा (११ बळी, एसआरपीए इलेव्हन)
मालिकावीर : अमित बलदोटा (२५८ धावा, चॅम्प्स सुपर किंग्ज)
सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षक : साहिल पारख (३ झेल, २ धावचीत, २ यष्टीचीत, बीस्मार्ट)
उदयोन्मुख खेळाडू : अमन अग्रवाल (एसआरपीए इलेव्हन)