पुणे - सोलापूर महामार्गावरील विविध अडचणींसंदर्भात दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची मागील आठवड्यामध्ये दिल्ली येथे भेट घेतली होती. त्याअनुषंगाने पुणे - सोलापूर महामार्गाच्या निगडित विविध समस्यांबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे अंतिम प्रस्ताव सादर करणेकामी चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक पार पडली.
बैठकीत कि.मी.१४ ते ४० - कवडीपाट (लोणीकाळभोर) ते कासुर्डी यादरम्यान जागेची उपलब्धता पाहून रस्तारुंदीकरण करणे व वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक ठिकाणी भुयारी मार्ग (अंडर पास) किंवा उड्डाणपूल (ओव्हरब्रिज) उभाण्यासाठी प्राथमिक प्रस्ताव तयार करणे, यवत ते पाटसपर्यंत सेवा रस्त्यासह इतर अपूर्ण कामे पूर्ण करणेसाठी ५७ कोटी रुपयांचा प्रस्तावास तयार करण्यात आला असून, त्यामध्ये समाविष्ट नसलेल्या काही बाबी सुचवून त्यांचा देखील समावेश या प्रस्तावामध्ये करून, सदर प्रस्ताव मान्यतेसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठवावा, कवडीपाट (लोणीकाळभोर) ते पाटसपर्यंतच्या मार्गाचा समावेश संत श्री. तुकाराम महाराज पालखी मार्गामध्ये करावा, तसेच या रस्त्यावरील सर्व अपघाती ठिकाणे निश्चित करावित व त्याठिकाणी अपघात होऊ नये यासाठी योग्य त्या उपाययोजनांचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठवावा आदी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
बैठकीसाठी प्राधिकरणाचे सुहास चिटणीस, अभिजित औटे, शैलेश माने उपस्थित होते.