पुणे : पुणे महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीची अंतिम मतदारयादी मंगळवार (दि. २४) रोजी विभागीय आयुक्त कार्यालय येथे व www.divcommpune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणार असल्याचे माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कळविले आहे.
पुणे महानगर नियोजन समातीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडणूक घेऊन तीस सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामधील ग्रामीण मतदार संघ (जिल्हा परिषद) ५८१, लहान नागरी क्षेत्र (नगरपरिषद) ११४ व मोठे नागरी क्षेत्र (महानगरपालिका) २८५ अशा एकूण ९८० मतदारांची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीवर केवळ १५ हरकती घेण्यात आल्या होत्या. अंतिम मतदारयादी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे.