पुणे :पुणे महापालिका निवडणुकीकरिता तयार करण्यात आलेल्या ५८ प्रभागांची अंतिम रचना शुक्रवारी (दि.१३) रात्री राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली. यात १७३ भावी नगरसेवकांचे प्रभाग कसे असतील, याची रचना प्रत्येकाला आता सविस्तर कळणार आहे.
महापालिका निवडणूक कधी होणार हे अद्याप निश्चित नसले तरी, प्रभाग रचनेची सर्व प्रक्रिया आज पूर्ण झाली आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य निवडणूक आयोगाने १० मार्च २०२२ रोजी ज्या टप्प्यावर निवडणुकीची प्रक्रिया स्थगित केली होती, तेथून पुन्हा ती सुरू केली आहे. आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार महापालिकेने मुदतीत म्हणजे आज १२ मे रोजी प्रभागरचनेच्या अंतिम प्रस्तावास, राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेऊन प्रभागरचनेच्या मराठी व इंग्रजी प्रतींसह राज्य निवडणूक आयुक्त यांच्या स्वाक्षरीसाठी सादर केली. परंतु लागलीच दुसऱ्या दिवशी रात्री आयोगाकडून अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली असून, अनेक इच्छुकांनी आपले प्रभाग बदलले का याबाबत चाचपणी सुरू केली आहे.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीकरिता तयार करण्यात आलेल्या ५८ प्रभागांची रचना कायम असून बहुतांश प्रमाणात आहे तीच रचना कायम राहिली असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. प्रभाग रचनेची सविस्तर माहिती https://www.pmc.gov.in/en/pmc-final-prabhag-rachna-2022 या संकेतस्थळ वर उपलब्ध आहे.