पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. परंतु, काही विद्यार्थ्यांच्या निकालात त्रुटी असल्याचे दिसून आले. निकालाबाबत विद्यापीठाकडे तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निकालाची पडताळणी करून निकालात बदल किंवा सुधारणा होत असल्यास विद्यापीठाकडून सुधारित निकाल जाहीर केला जाणार आहे, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी सांगितले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठातर्फे पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा 12 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. तसेच बहुतांशी परीक्षांचे निकाल विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आले. मात्र,निकालासंदर्भात परीक्षा विभागाकडे विद्यार्थ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
विद्यापीठाने या तक्रारींचे विश्लेषण व तथ्यता पडताळण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रामुख्याने विषय व विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रत्यक्ष परीक्षा यांमधील तफावत, दोन वेगवेगळ्या ईमेल आयडीचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देणे, तांत्रिक कारणामुळे ऑनलाईन परीक्षामध्ये व्यत्यय येऊन परीक्षा पूर्ण न होणे आदी तक्रारींचा विद्यापीठातर्फे विचार केला जात असून त्यासंदर्भातील अंतिम निर्णय येत्या ३ डिसेंबर पर्यंत कळवण्याबाबत कार्यवाही केली जाणार आहे, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.