राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने नुकतेच शरद पवार गटाला नवे नाव आणि चिन्ह बहाल केले आहे. शरद पवार गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' असे नाव आणि 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह मिळाले आहे. यानंतर शनिवारी, या चिन्हाचे किल्ले रायगडावर अनावरण करण्यात आले. यावेळी शरद पवारही उपस्थित होते. यासंदर्भात बोलताना भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी खासदार शरद पवार यांना टोला लगावला आहे. "शेवटी 40 वर्षांनंतर शरद पवार रायगडावर गेले. याचे श्रेय अजितदादांनाच द्यावे लागेल," असे फडणवीस यांनी म्हटले आहे. ते पुण्यात प्रत्रकारांसोबत बोलत होते.
काय म्हणाले फडणवीस? -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मला एकाच गोष्टीचा आनंद आहे की, 40 वर्षांनंतर पवार साहेब शेवटी रायगडावर गेले. अजितदादांना एका गोष्टीचं क्रेडिट तर द्यावं लागेल. अजितदादांमुळे शेवटी 40 वर्षानंतर पवार साहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी जावं लागलं. आता तुतारी कुठे वाजते, कशी वाजते, किती वाजते हे आपल्याला भविष्यात दिसेलच," असे ते म्हणाले. चंद्रकांत पाटलांनीही काढला चिमटा - तत्पूर्वी, रायगडावर लोकसभेपूर्वी तुतारी वाजतेय... वाजेल का...?' असा प्रश्न सोलापूर येथे एका पत्रकाराने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना केला असता ते म्हणाले, "तुताऱ्या वाजवा नाही तर मशाली पेटवा, पण शेवटी महाराष्ट्रात आतापर्यंत आम्ही 45 म्हणत होतो, पण आता क्रॉस करू असं दिसायला लागलं आहे." एवढेच नाही तर, "विरोधी पक्षाने शेवटपर्यंत हार मानायचीच नसते ना. सारखं म्हणायचंच असतं, शरद परावांनी असं म्हणायचंच असतं की, माझे 20-22 येणार आहेत. नशीब ते 20-22 तरी देतायत इकडे. पण त्यांना हे कळून चुकले आहे की 45 वैगेरे काही नाही, बहुतेक 48 पर्यंत गाडी जाईल," असा चिमटाही पाटील यांनी शरद पवारांना काढला.