प्रतीक्षेनंतर मिळाले नवीन मुख्याधिकारी
बारामती :बारामती नगरपरिषदेला अखेर ८१ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नवीन मुख्याधिकारी मिळाले आहेत. नगरपरिषदेचा जवळपास ८१ दिवसांपासून मुख्याधिकाऱ्यांशिवाय कारभार सुरू होता. मुख्याधिकारी नसल्याने नगरपरिषदेच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला होता.आता नवीन मुख्याधिकारी महेश रोकडे सोमवारी (दि. १३) हजर झाल्यावर रखडलेल्या कामकाजाला गती मिळण्याची आशा आहे.
यापूर्वी रोकडे यांच्याकडे पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छ सर्वेक्षण अभियानाची जबाबदारी होती. सोमवारी मुख्याधिकारी रोकडे यांचे नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, गटनेते सचिन सातव,ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर,प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी स्वागत केले.
दरम्यान,आज बारामती नगरपरिषदेत हजर झालेले मुख्याधिकारी रोकडे हे गेल्या पाच वर्षांतील पाचवे मुख्याधिकारी आहेत. यापूर्वी ७ ऑगस्ट २०१५ पासून नीलेश देशमुख, मंगेश चितळे, योगेश कडुसकर, किरणराज यादव हे मुख्याधिकारी त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदलून गेले आहेत. रोकडे हे पाचवे मुख्याधिकारी आहेत. मुख्याधिकाऱ्यांना काम करण्यास अनुकूल वातावरण नसल्याची चर्चा त्यामुळे विरोधी गटाकडून सातत्याने होत आहे. त्यातच बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराचा चेहरामोहरा बदलणारे महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत.त्यामुळे मुख्याधिकारी रोकडे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणार का, अशी चर्चा जोर धरत आहे. कोविडची संभाव्य तिसरी लाट, बारामती नगरपरिषदेची ढासळलेली अर्थव्यवस्था, अशी विविध आव्हाने मुख्याधिकारी रोकडे यांच्यासमोर आहे.
... ‘मनसे’ने फटाक्यांच्या आताषबाजीत
मोदक वाटप करीत केले स्वागत
मुख्याधिकारी नसल्याने कोविड नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना आखताना देखील अडचणी निर्माण झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मनसेने मुख्याधिकारी देता का? असा सवाल व्यक्त करणारे फलक हाती घेत नगरपरिषदेसमोर रस्त्यावर उतरत मागील महिन्याच्या अखेरीला घोषणा देत अभिनव पध्दतीने आंदोलन केले होते.आज मुख्याधिकारी महेश रोकडे हजर झाल्याची माहिती मिळताच ‘मनसे’चे ॲड. पोपटराव सूर्यवंशी,ॲड. नीलेश वाबळे,ॲड. भार्गव पाटसकर, प्रवीण धनराळे, केदार चिटणीस यांनी नगरपरिषद कार्यालयासमोर फटाक्यांची आताषबाजी केली.तसेच कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन मोदक वाटत स्वागत केले.
बारामती नगरपरिषदेचे नूतन मुख्याधिकारी महेश रोकडे यांचे गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर आदींनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
१३०९२०२१ बारामती—०७