पुणे : यंदा दिवाळीपूर्वी कुडकुडणारी थंडी पडलीच नाही. पण आता दिवाळीतील अखेरच्या दिवसांमध्ये मात्र गारठा वाढला आहे. ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या असून, १८ नोव्हेंपर्यंत किमान तापमानात घट होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्यामुळे काही भागात पावसाने हजेरी देखील लावली होती. परंतु आता ढगाळ वातावरण दूर झाले असून, निरभ्र आकाश पहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस थंडीत वाढ होणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने दिला आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय आहेत. त्यामुळे राज्याच्या थंडीत वाढ होईल. सध्या महाराष्ट्रावर कोणत्याही ढगांची निर्मिती होणारी यंत्रणा तयार झालेली नाही. त्यामुळे आकाश निरभ्र राहणार आहे. १८ नोव्हेंबरपर्यंत किमान तापमानात घट होईल. पुढील पाच दिवस पुणे शहरातील हवामान कोरडे राहील. येत्या ७२ तासांमध्ये पहाटे धुके पडेल. आताच्या तापमानात आणखी दोन डिग्री सेल्सिअसने घट होऊन थंडीत वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.