कळस (पुणे) : इंदापूर व बारामती तालुक्यातील सुमारे १७ गावांना वरदान ठरणाऱ्या लाकडी निंबोंडी उपसा जलसिंचन योजनेसाठी ३४८ कोटी रुपयांचा निधी राज्यशासनाने मंजूर केला आहे. त्यामुळे या योजनेला गती मिळणार असून या गावांमधील सुमारे ७ हजार २५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना भरणे यांनी सांगितले की, कुंभारगाव (ता. इंदापूर ) येथून उचल पाणी करुन शेती क्षेत्रास बंद पाईप लाईनने, सिंचनाचा लाभ देण्यासाठी लाकडी - निंबोडी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बजेट मांडताना तीन दशकांपासून खोळंबलेल्या लाकडी - निंबोडी उपसा सिंचन योजनेला भरिव तरतुद केली होती. आता या योजनेला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी ३४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे यांचे मोठे सहकार्य यासाठी लाभले. त्यामुळे निधी उपलब्ध झाला असल्याचे भरणे यांनी सांगितले.
ही योजना पुर्णत्वास आल्यानंतर इंदापूर तालुक्यातील अवर्षणप्रवण भागातील शेतकऱ्यांचा कायमचा पाणी प्रश्न सुटणार आहे. उजनी जलाशयातून वीजपंपाद्वारे पाणी उचलून देण्याचे नियोजन आहे. या भागात नीरा डाव्या कालवा व खडकवासला कालव्याचे पाणी जात नव्हते. त्यामुळे शेती अडचणीत होती या गावांतील शेतकऱ्यांना या योजनेतून पाणी मिळण्यास मदत होणार आहे. या योजनेच्या कामाचे भूमिपूजन लवकरच होणार आहे.
गेली २५ वर्षे लाकडी निंबोडी योजनेची सातत्याने मागणी होत आहे. प्रत्येक विधानसभेला हा पाणीप्रश्न गाजत होता. ही योजना आगामी काळात मार्गी लागणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी बाजी मारली आहे. शेतीच्या पाण्याचा मोठे प्रश्न मार्गी लागल्याने विरोधकांंसमोर भरणे यांचे मोठे आव्हान असणार आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची पकड यामुळे मजबुत होणार आहे.
यामध्ये तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील गावे व सिंचन होणारे क्षेत्र हेक्टरी मध्ये लाकडी (७४०), निंबोडी (४५५) काझड (५१३) शिंदेवाडी (५४३) निरगुडे (६६५) लामजेवाडी (२३८) म्हसोबावाडी (७५६) शेटफळगडे (१३८) वायसेवाडी (१६२) धायगुडेवाडी (१२२) या १० गावंमधील ४३३८ हेक्टर क्षेत्राला दीड हजार मीमी व्यासाची बंद पाईपलाईनमधून पाणी देण्याची नियोजन आहे. बारामती तालुक्यातील कटफळ (७४४) सावळ (९०४) जैनकवाडी, (४७७) पारवडी (२०८) कन्हेरी (२५७) काटेवाडी (२१६) गाडीखेल (१०२) तालुक्यात एकूण क्षेत्र २९१३ हेक्टर आहे .दोन्ही तालुक्यातील ,असे एकूण ७२५० हेक्टर क्षेत्राला याचा लाभ होणार आहे.