पुणे : कोरोनाच्या धास्तीने मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी बंद केलेला भुसार व गूळ बाजार तातडीने सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. तर व्यापाऱ्यांच्या मागणी नुसार संपूर्ण बाजार आवार निर्जुंतुकीकरण करणे, दररोज केवळ 100 वाहनांनच प्रवेश देणे, बाजार आवारात प्रवेश करणाऱ्यांचे थर्मल स्कॅनिंग करणे आदी विविध उपाययोजना करण्याचे आश्वासन बाजार समिती प्रशासनाने दिले आहे. यामुळे शनिवारी (दि.23) रोजी दि पूना मर्चंट चेंबरची बैठक घेऊन येत्या सोमवार पासून भुसार व गूळ बाजार पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली.
गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील भुसार व गूळ बाजारातील आठ व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने व यामुळे एका व्यापाऱ्याचा मृत्यू झाल्याने बाजार आवारातील सर्वंच व्यापारी व अन्य बाजार घटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाच्या धास्तीने व्यापाऱ्यांनी 19 मे पासून बाजार बंद ठेवला आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राला अन्नधान्य व अन्य किराणा मालाचा पुरवठा करणारा भुसार व गूळ बाजार बंद झाल्याने अन्नधान्य तुटवडा निर्माण होऊन गोंधळ होईल. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत बाजार बंद ठेवता कामा नये, अशा स्पष्ट सूचना गेल्या आठवड्यात दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी चेंबरचे पदाधिकारी, बाजार समिती प्रशासक यांची गुरूवारी बैठक घेतली. या बैठकीत बाजार तातडीने सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. दरम्यान बाजार समिती प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनाची माहिती प्रशासक बी.जे. देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये संपूर्ण बाजार आवार निर्जुंतुकीकरण करण्यात आले असून , बाजार आवार व व्यापारी, बाजार घटकांना कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचविण्यासाठी इतर अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. यात दररोज केवळ 100 वाहनांनच प्रवेश देणे, बाजार आवारात प्रवेश करणाऱ्यांचे थर्मल स्कॅनिंग करणे, प्रत्येकाला मास्क घालणे बंधनकारक करणे, भुसार व गूळ बाजार सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू ठेवणे, सुकामेवा बाजार 10 ते दुपारी 3 पर्यंत सुरू ठेवणे आदी निर्णय घेण्यात आले असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. ------ गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमध्ये सर्व व्यापार बंद असताना आम्ही सर्व धोका पत्करून बाजार सुरू ठेवला होता. परंतु आठ दिवसांपूर्वी मार्केटयार्डातील भूसार बाजारात कोरोनाची लागण होऊन एका व्यापाऱ्याचा मृत्यू झाला आहे. करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन चेंबरने भुसार बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शनिवारी कार्यकारणीची बैठक घेऊन येत्या सोमवारपासून ( ता.२५ मे) भूसार बाजार पुन्हा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेणार आहोत - पोपटलाल ओस्तवाल, अध्यक्ष दि पूना मर्चंट चेंबर