पुणे: आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी कसबा विधानसभा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पोटनिवडणूक येत्या २६ फेब्रुवारीला रोजी पार पडणार आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, संभाजी ब्रिगेड सर्वानीच जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजप प्रयत्नशील असून कसबा निवडणूक बिनविरोध करावी अशी विनंती करत आहे. परंतु विरोधी पक्षांनी निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. त्यातच भाजपनेही बैठक घेण्यास सुरुवात केली आहे. पुण्यात आज भाजप- शिंदे गट आणि इतर संघटनांसोबत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेतली आणि या पोटनिवडणुकांसाठी आज संध्याकाळपर्यंत उमेदवार जाहीर होणार असल्याचे सांगितले आहे.
पाटील म्हणाले, येत्या ६ फेब्रुवारीला उमेदवार अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे, त्यावेळी आम्ही अर्ज दाखल करणार आहोत. आतापर्यंत कोणाचे ही नाव निश्चित झालेले नाही. मात्र आज रात्री उशिरा नावे जाहिर होतील. कसबा मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज सकाळी ११ वाजता आणि चिंचवडच्या उमेदवाराचा अर्ज १ वाजता भरला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
महाविकास आघाडी एकत्र लढणार
पुण्यातील कसबा आणि चिचंवड मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. दोन्ही मतदार संघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. कसबा हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असून या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास काँग्रेसकडून तीन उमेदवार इच्छुक आहेत. या दोन पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारीला मतदान होत असून अर्ज भरण्याची शेवटची तारिख ७ फेब्रुवारी आहे. कसबा व चिंचवड या दोन्ही जागांबद्दल कालच्या बैठकीत चर्चा झाली. कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडे तीन इच्छुक उमेदवार आहेत. ही नावे हायकमांडकडे पाठवली जातील व त्याचा निर्णय घेतला जाईल. या दोन्ही जागांसाठी आमची आघाडी असल्याने एकत्रितपणे निवडणूक लढवली जाईल असे नाना पटोले यांनी सांगितले.