मांजरी : गेल्या ८-१० दिवसांपासून ओसंडून वाहत असलेल्या कचराकुंड्यांतील कचरा उचलण्यास अखेर सोमवारपासून (ता. १९) सुरुवात झाली आणि सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.
मांजरीची कचराकोंडी हा कळीचा मुद्दा बनला आहे. विरोधकांनी कचरा डेपो परिसरातील ठराविक लोकांना हाताशी धरून, संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची दिशाभूल करत मला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सरपंच शिवराजअप्पा घुले यांनी केला होता. अनेक दिवस कचरा न उचलल्यामुळे कचराकुंड्या न राहता गावात विविध ठिकाणी कचऱ्याचे डेपोच तयार झाल्याचे चित्र होते. या पार्श्वभूमीवर, सोमवारपासून (ता. १९) सरपंच शिवराजअप्पा घुले यांच्या उपस्थितीत महादेवनगरपासून जेसीबीच्या साहाय्याने कचरा उचलण्याचे काम सुरू झाले.
नेमका तोडगा काय निघाला? यासंदर्भात सरपंच शिवराजअप्पा घुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कचरा डेपो ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांना मी स्वतः विनंती केली आहे. आता गाव थोड्याच दिवसांत महापालिकेत समाविष्ट होण्याच्या उंबरठ्यावर आहे. सध्या कोरोनोच्याबाबत मांजरी हॉटस्पॉटमध्ये आहे. तेव्हा किमान महिना-दोन महिने कचरा टाकण्यास अटकाव करू नये. ही वस्तुस्थिती ऐकल्यावर या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली. गेल्या ७-८ वर्षांपासून हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. महापालिकेशीही पत्रव्यवहार केला होता. त्यांनी कचरा विल्हेवाट लावण्यासाठी टनामागे रु. ५५३ ची मागणी केली होती. तसेच ओला व सुका असे वर्गीकरण करून पदर खर्चाने महापालिकेकडे आणून द्यावा, अशी त्यांची अपेक्षा होती. दर कमी करण्यासंदर्भातील बोलणी झाली. हा आर्थिक भार ग्रामपंचायतीस पेलणे कठीण होते. परिणामी हा प्रयत्न निष्फळ ठरला.
गावातील बऱ्याच भागात ग्रामपंचायतीच्या वतीने आता ओला आणि सुका कचरा ठेवण्यासाठी नागरिकांना मोफत प्लॅस्टिक बादल्यांचे वाटप करण्यात आले आहे. कचरागाड्यांवरील ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून कचराप्रश्नाचे गांभीर्य नागरिकांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्नही केला जात आहे.
व्यवस्थापन कोलमडले
नागरिकांनी आता जबाबदारीने वागून ओला आणि सुका कचरा असा विलगीकरण करूनच कचरा जमा करावा. वेगाने होणाऱ्या नागरीकरणामुळे अस्तित्वात असलेल्या अनेक ग्रामपंचायतीचे कचरा व्यवस्थापन कोलमडून पडत आहे. अशा समस्यांना सामोरे जात असताना यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल करण्याचा सूतोवाच सरपंच घुले यांनी केला.
छायाचित्र ओळ
ग्रामपंचायतीकडून जेसीबीच्या साहाय्याने, कचरा उचलण्यास अखेर सुरुवात झाली
-----------
फोटो- मांजरी कचरा