विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या संकल्पनेतून व कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्या प्रयत्नांतून आण्विक निदान संशोधन केंद्रात गुरुवारी प्रत्यक्ष तपासणीला सुरुवात झाली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ एन. एस. उमराणी, अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, डॉ. पराग काळकर, सीए अतुल पाटणकर, डॉ. संजीव सोनवणे आदी उपस्थित होते. मार्च- एप्रिल महिन्यातच हे केंद्र सुरू होणार होते. परंतु, काही परवानग्या मिळण्यास विलंब झाल्याने हे केंद्र सुरू करण्यास विलंब झाला.
डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले की, हे केंद्र सुरू करण्यासाठी विविध संस्थांच्या परवानग्या घेणे गरजेचे होते, त्यानुसार आयसीएमार, आयबीएससी एएफएमसी, डीएमईआर, पीएमसी या सर्व संस्थांची परवानगी घेण्यात आली आहे.
या केंद्राच्या नोडल अधिकारी डॉ. करिश्मा परदेसी म्हणाल्या की, विद्यापीठाच्या विविध विभागातील दहा प्राध्यापक यावर काम करत आहेत. या सर्व प्राध्यापकांनी ४ महिने आयसर या संस्थेत प्रत्यक्ष तपासणी प्रक्रियेत भाग घेत सुमारे दहा हजारहून अधिक तपासण्या केल्या. यामध्ये डॉ. अभिजित कुलकर्णी, डॉ. विठ्ठल बारवकर, डॉ. स्मृती मित्तल,डॉ. वैजयंती ताम्हाणे आदी प्राध्यापक सहभागी झाले.
शंभर तपासणी क्षमता असणाऱ्या विद्यापीठातील या केंद्रात हॉस्पिटमधून रुग्णांचे सॅम्पल्स रोज येतील. तसेच ३० स्वयंसेवकांच्या मदतीने या सॅम्पल्सची तपासणी करून त्यांचे निकाल पाठवून दिले जातील.या केद्रात प्रत्यक्ष येणाऱ्या रुग्णाची तपासणी केली जाणार नाही. गुरुवारी झालेल्या चाचण्यांमध्ये आयसरमधील चाचण्यांचे पुनर्परीक्षण करण्यात आले. या तपासण्या हळूहळू वाढवण्यात येणार आहेत असेही डॉ. परदेसी यांनी सांगितले.
-----------
विद्यापीठच्याच एका इमारतीत जैवशास्त्र विभागातील प्राध्यापक व विज्ञान विषयातील स्वयंसेवकांच्या मदतीने कमी खर्चात आण्विक निदान संशोधन केंद्र सुरू केले आहे. यासाठीचा सर्व निधी हा विद्यापीठाचा असून हे टेस्टिंग मोफत केले जात आहे.
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
-----