पुणे : भिडे पुलाच्या खाली मगर पकडण्यासाठी लावलेल्या जाळीत पाण्यासोबत वाहून आलेला कचरा अडकला होता. तेथे भरपूर प्रमाणात कचरा साठून राहिला असल्याने तो लगेच साफ करणे गरजेचे होते. त्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द केले होते. त्यानंतर जागरूक नागरिकांनी नदी स्वच्छतेसाठी एकत्र येऊन एक ग्रुप तयार केला आणि त्यांनी गुरुवारी स्वच्छता मोहीम राबविली.
वाइल्ड ॲनिमल्स अँड स्नेक प्रोटेक्शन सोसायटी आणि पुणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेत संस्थेचे अध्यक्ष आनंद अडसूळ, संतोष थोरात,कृष्णा गुंजुटे, पियुष शहा,जय मोरे यांनी मोलाचे योगदान दिले. तसेच, पुणे महापालिका विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय आणि घोलेरोड क्षेत्रीय कार्यालयामधील सेवक व अधिकाऱ्यांनी सहकार्य केले. तसेच राहिलेले काम रविवारी (दि. २८) सकाळी 8 वाजता करण्यात येणार आहे. या मोहिमेत अनेक नागरिक आणि स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिका स्वच्छता करणार म्हणून नुसतेच आश्वासने देत आहे. परंतु, आता नागरिकांनीच पुढाकार घेऊन नदीपात्र स्वच्छ करण्याचा निर्धार केला आहे.