उरुळी कांचन : अखेर ‘डेमू’ने केला आज पुणे-दौंड प्रवास सुरू! ठिकठिकाणी रेल्वे प्रवाशांनी व उत्सुकतेपोटी नागरिकांनी नवी गाडी बघायला गर्दी केली. भाजपा व राष्ट्रवादीमध्ये श्रेय घेण्यासाठी चाललेली स्पर्धा बघून नागरिकांची झाली चांगलीच करमणूक. पुणे ते दौंड दरम्यान रेल्वे प्रवाश्यांचा वर्षानुवर्षे प्रतीक्षेत असलेल्या लोकल रेल्वे सेवेच्या धर्तीवरील डिझेल इंजिनवर कार्यरत असणारी डेमू (डिझेल इंजिन मल्टिप्लेट युनिट ) रेल्वे सेवा शुक्रवार दि. २५ रोजी दुपारी २.५० वाजता उरुळी कांचन रेल्वे स्थानकावर पोहोचताच या रेल्वे सेवेच्या शुभारंभाचे उरुळी कांचन रेल्वेप्रवासी व ग्रामस्थांनी फटाके वाजवून उत्साहात स्वागत करून आनंद व्यक्त केला. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरून पुणे रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या डेमू रेल्वे गाडीला हिरवा सिग्नल दाखवून या लोकल सेवेचे लोकार्पण केले. या रेल्वेचे पहिल्या फेरी दरम्यान उरुळी कांचन (ता. हवेली ) रेल्वे स्थानकावर दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी आगमन झाले. या रेल्वेने खासदार सुप्रिया सुळे, रमेश थोरात, अशोक पवार, राष्ट्रवादीचे नंदकुमार काळभोर, युगंधर काळभोर यांनी यावेळी प्रवास करून या शुभारंभाचा आनंद घेतला. वासुदेव काळे, अश्विनी कांचन, सुनील कांचन, अजिंक्य कांचन, विकास जगताप, जितेंद्र बडेकर, भाऊसाहेब कांचन, सागर कांचन, राजश्री वनारसे, बाजीराव बडेकर, राजेंद्र कांचन, सुभाष बगाडे, सुभाष टिळेकर, संजय टिळेकर, गणपतराव कड, विजय तुपे, सुनील तुपे, उरुळी रेल्वे स्टेशन प्रबंधक डी. आर. माने भाजपा शहराध्यक्ष श्रीकांत कांचन आदी मान्यवर उपस्थित होते.
अखेर ‘डेमू’ने केला पुणे-दौंड प्रवास सुरू
By admin | Published: March 27, 2017 2:08 AM