लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य शासनाने हवेली तालुक्यातील २३ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी अधिसूचना काढली. त्यानंतर याबाबत लोकांच्या हरकती व सूचना मागविल्या. शासनाकडे आलेल्या हरकती, सूचनावर सुनावणी घेण्याचे आदेश शासनाने विभागीय आयुक्त यांना दिले होते. त्यानुसार अखेर मोठ्या प्रतिक्षेतेनंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी १९ आणि २० एप्रिल रोजी सुनावण्या जाहीर केल्या आहेत.
आगामी महापालिका निवडणुकी पूर्वी हवेली तालुक्यातील २३ गावे महापालिका हद्दी समाविष्ट करण्याचा घाट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घातला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा विषय प्रलंबित असून, आता पर्यंत केवळ चर्चाच होती. पण आता किमान निवडणुकीमुळे तरी हा प्रश्न मार्गी लागणार आहे. शासनाच्या नगर विकास विभागाने ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची अधिसूचना एक वर्षापूर्वी काढली. त्यानंतर ही गावे समाविष्ट करण्याबाबत लोकांच्या काही हरकती, सूचना असल्यास त्या प्रशासनाकडे करण्यास सांगण्यात आले. लोकांनी केलेल्या हरकती व सूचनांची छाननी करून संबंधीतानां सुनावणी देण्याकरीता शासनाच्या वतीने विभागीय आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या हरकती व बावतचे एकूण ४९१ अर्जाबाबत सुनावणीचे कामकाज १९ व २० एप्रिल रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यानुसार गावातील चावडीवर व ग्रामपंचायत कार्यालय याबाबत प्रचार व प्रसिद्ध करून नागरिकांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन आयुक्त यांनी केले आहे.
------
या गावांची होणार सुनावणी
सुस, कोपरे, नऱ्हे, वडाचीवाडी, नादोशी, किरकटवाडी, होळकरवाडी, मांजरी, कोळेवाडी, नांदेड, वाघोली, पिसोळी