पुणे: पावसाळ्यात तळजाई टेकडीवरून पाण्याचा प्रवाह पायथ्याशी येतो. त्यामुळे पायथ्याशी असणाऱ्या भागांमध्ये पूरजन्यपरिस्थिती निर्माण होते. त्यावर उपाय म्हणून पुणे वनविभागाने तळजाई टेकडीवर छोटे बंधारे बांधत पाण्याचे व्यवस्थापन करण्याची योजना आखली आहे.
दरवर्षी पावसाने तळजाई टेकडीवरील पाणी पायथ्याशी येते. खालच्या भागात असणाऱ्या सहकारनगर २, स्वानंद सोसायटी, सावरकरनगर, क्रांती सोसायटी, भोसले पार्क, खोराड वस्ती, हिंगणे व सिंहगड रस्ता या प्रमुख भागात पूरजन्यपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे अनेक नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. सप्टेंबर २०१९ मध्ये पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले होते. त्याचप्रमाणे कात्रज, नदीपात्र, अशा ठिकाणाबरोबरच सहकारनगरमध्येही पूर आला होता. या वादळी पावसाच्या पुरामुळे सहकारनगरमधील चार लोकांसह, इतर भागातील १४ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर या पायथ्याशी असणाऱ्या भागातील लोकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तर काहींची वाहने पाण्यात वाहून गेली होती. पुढील काळात पुराचे हे संकट पुन्हा येऊ नये म्हणून पुणे वनविभागाने पुढाकार घेतला आहे. पूर टाळण्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन करण्याचे ठरवले आहे.
बुधवारी वन अधिकारी, माजी राज्य पाटबंधारे अधिकारी, पाणलोट व्यवस्थापन तज्ञ आणि स्थानिक रहिवाशी यांच्या पथकाने टेकडीचे सर्वेक्षण केले. टेकडीवरील पाणी नियोजन आणि कंपाउंड भिंत बांधण्याचे काम सुरू होणार असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी राज्य वनविभागाकडून चार कोटींचा निधीही मंजूर झाला आहे.
पुण्याचे वनसंरक्षक राहुल पाटील म्हणाले, आम्ही बुधवारी तळजाई आणि पायथ्याचे सर्वेक्षण केले आहे. तळजाईवर ४० छोटी बंधारे बांधण्याचे काम मे अखेरीस पूर्ण होणार आहे. तसेच पायथ्याशी एक तलाव बांधण्यात येणार आहे. यामुळे पायथ्याशी निर्माण होणारी पूरजन्यपरिस्थिती कमी होईल. तलावाचे पाणी टेकडीवरील झाडांसाठी वापरण्यात येईल. कंपाउंड भिंतीचे काम यापूर्वीच सूरू झाले आहे. तसेच पावसाचे पाणी खाली येऊ नये. म्हणून आजूबाजूला घनदाट बांबूची झाडेही लावण्यात येणार आहेत.
" अशा प्रतिबंधात्मक उपाययोजना झाल्या की केवळ २० टक्केच पावसाचे पाणी डोंगरावरून खाली जाईल. त्यामुळे भविष्यात आजूबाजूच्या परिसरातील पूर थांबेल" असे स्थानिक नागरिकाने सांगितले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नितीन कदम म्हणाले की, आम्ही पूरजन्यपरिस्थिती दूर करण्याची राज्याचे वनमंत्री दत्तात्रय भरणे यांना विनंती केली. भरणे यांनी कंपाउंडच्या पुनर्बांधणीबरोबरच या पाणी नियोजनाला सहमती दर्शवली आहे.