पुणे - पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा सभागृहात घेण्याची परवानगी राज्य शासनाने अखेर दिली आहे. मात्र आजची सभा प्रभाग समिती मधून व्हिडीओ कॅान्फरंसींगने घेण्याचा निर्णय आधीच जाहीर झाल्या असल्याने नगरसेवकांना जवळपास वर्षभरानंतरही महापालिकेच्या सभेला सभागृहात हजर राहण्याची संधी मिळणार नाहीये.
पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेवरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद पेटला होता. सत्ताधारी भाजप विरोधकांची गळचेपी करण्यासाठीच सर्वसाधारण सभा होवु देत नसल्याचा आरोप विरोधी पक्ष करत होते. तर सभा न घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सत्तेत असलेल्या राज्य सरकारने घेतला आहे। आम्ही त्यांना विनंती करुनही त्यांच्याकडुन काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचा दावा सत्ताधारी भाजपने केला होता.
याबाबत नुकताच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली होती. पवार सकारात्मक असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांची केल्यानंतरही महापौरांनी मात्र अधिक्ृत पत्र आल्यावरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते.
अखेर राज्य शासनाने महापालिका आयुक्तांचे कोरोनाचे नियम पाळत सभेला परवानगी दिली आहे. “राज्य सरकारची परवानगी आल्याने सभा महापालिकेत होईल” असं विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी जाहीर केले आहे.
पण यापुर्वीच व्हिडीओ कॅान्फरंसींगचा निर्णय झाला असल्याने आज प्रभाग समित्यांमधुनच सभा घेतली जाणार असल्याचे नगरसचीव शिवाजी दौंडकर यांनी जाहीर केले आहे. “ आज जाहीर प्रकटन दिले आहे. आणि प्रभाग कार्यालयात तयारीही झाली आहे. त्यामुळे आजची सभा आॅनलाईनच होईल. ही सभा तहकूब करुन पुढची महापालिकेत घेतली जाईल” असं लोकमतशी बोलताना दौंडकर यांनी सांगितले.