पुणे : कोरोनामुळे गेल्या एक-दीड वर्षांपासून ग्रामसभा आयोजित करण्यावर मर्यादा आल्या आहेत. परंतु गेल्या काही दिवसांत पुणे जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यामुळेच १५ ऑगस्टला ग्रामपंचायतींना ग्रामसभा घेता येणार आहे. गावांतील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन सुरक्षित अंतर राखून ग्रामसभांचे आयोजन करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ७ नुसार १५ ऑगस्टला ग्रामसभा आयोजित केली जाते. मात्र, सद्यस्थितीत १५ ऑगस्टला ग्रामसभा घ्यावी किंवा नाही याबाबत मार्गदर्शनासाठी काही जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून शासनाकडे विचारणा करण्यात आले होते. त्यानुसार शासनाने दिलेल्या पत्रात कोविड प्रादुर्भावास प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने यापूर्वी घालण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील मागील एक महिन्यातील कोविड रुग्णसंख्या व जिल्ह्याचा पाॅझिटिव्ह दर व ज्या गावांमध्ये ग्रामसभा आयोजित करावयाची आहे. तेथील रुग्णसंख्या लक्षात घेऊन ग्रामसभेचे आयोजन करण्यात यावे, अशा स्पष्ट सूचना शासनाने दिल्या आहेत. या संदर्भातील अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संयुक्तपणे दिले आहेत. ग्रामसभा घेण्याचा निर्णय झाल्यास उपाययोजनांचे पालन करून ग्रामसभा घेण्यात याव्यात, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.